नागपूर : एकीकडे शहरातील सुरक्षायंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीत व्यस्त असताना शुक्रवारी बेसा मार्गावरील रेवतीनगर दोन स्फोटांमुळे अक्षरश: हादरले. परिसरात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर दोन रुग्णवाहिकांना आग लागली. वेळेत आग विझविण्यात आल्याने इतर सिलिंडर्सला बाजुला करण्यात यश आले व मोठी दुर्घटना टळली.
ओंकारनगर ते बेसा या मार्गावर असलेल्या रेवतीनगरात दोन रुग्णवाहिका उभ्या होत्या. त्यात ऑक्सिजन सिलिंडर्स होते. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक एका रुग्णवाहिकेला आग लागली. आगीमुळे लोकांनी त्वरित अग्निशमन दलाला फोन केला. काही वेळातच मोठ्या आवाजासह लागोपाठ दोन स्फोट झाले. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा हादरा बसला.
बॉम्बस्फोट झाल्याच्या शंकेने लोक घराबाहेर निघाले. आगीच्या ज्वाळा या दूरपर्यंत दिसत होत्या. अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या कालावधीत तेथे पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोन्ही रुग्णवाहिकांमध्ये मोठी आग लागली होती. तरी प्रयत्नांची शिकस्त करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दोन्ही रुग्णवाहिकांची राखरांगोळीच झाली. पोलिसांचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या स्फोटांमध्ये कुणीही जखमी झाले नाही. आगीच्या कारणांचा तपास करण्यात येत आहे.
घरांच्या काचा फुटल्या
स्फोटांची तीव्रता जास्त होती व यात आजूबाजूची घरे तसेच हॉटेल्सच्या खिडक्यांच्या काचादेखील फुटल्या. सोबतच सिलिंडरचे पत्रे दूरवर उडून पडले. नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.