सिंगापूर आणि दुबईतून संचालन : तपास यंत्रणा सतर्कनरेश डोंगरे नागपूरशेअर मार्केटला मागे टाकणाऱ्या डब्बा व्यापाराचे सिंगापूर आणि दुबईतून संचालन होत असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची डी कंपनी डब्बा व्यापारात जुळली आहे काय, त्याची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती एका उच्च अधिकाऱ्याने लोकमतला दिली आहे.आंतरराट्रीय क्रिकेट सट्टा दुबईहून संचालीत केला जातो. डी कंपनीचे क्रिकेट सट्ट्यावर नियंत्रण आहे. दाऊदचा हस्तक मुकेश कोचर हा पूर्वी क्रिकेट सट्ट्याची भारतातील सूत्रे सांभाळायचा. ९ वर्षांपूर्वी भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नागपुरात झाला होता. यावेळी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू मर्लोन सॅम्युअल याचे मुकेश कोचर आणि अन्य मॅच फिक्सरसोबत झालेले बोलणे नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त शिवप्रताप सिंह यादव यांनी ट्रॅप केले होते. मॅच फिक्सिंगचा हा प्रकार असल्याच्या संशयाने तेव्हा क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. त्यावेळी मुकेश कोचरने नागपूर पोलिसांना वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून धमकीही दिली होती. त्यातूनच आंतरराष्टीय क्रिकेट बेटिंग दुबईतून डी कंपनी संचालित करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. क्रिकेट सट्टा आणि अवैध चिजवस्तू खरेदीच्या ( डब्बा व्यापाराच्या) आडून चालणाऱ्या सट्टेबाजीत बरेच साम्य आहे. फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे क्रिकेटचा सट्टा ज्या दिवशी सामना असतो, त्याच दिवशी चालतो. डब्बा व्यापाराची सट्टेबाजी वर्षातील ३६५ दिवस चालते. शेअर मार्केटला डब्बा व्यापाराचे आव्हाननागपूर : डब्बा व्यापारात दाऊदच्या डी कंपनीचे नाव जुळले असल्याची कुणकुण लागल्याने प्रस्तुत लोकमत प्रतिनिधीने या प्रकरणाच्या चौकशीवर नजर असलेल्या एका उच्च अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यांना विचारणा केली असता त्यांनी ‘शक्यता नाकारता येत नाही. चौकशी सुरू आहे’, अशी सूचक प्रतिक्रिया नोंदविली. देशाच्या शेअर मार्केटला डब्बा व्यापाराने आव्हान निर्माण झाल्याचेही या उच्च अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. नागपुरातील स्टॉक मार्केट आणि डब्बा ट्रेडिंगचे प्रमाण २५-७५ टक्के असल्याचा अंदाज आल्याची माहिती दुसऱ्या एका तपास अधिकाऱ्याने दिली. काळा पैसा (ब्लॅक मनी) संग्रहित करणारी मंडळी २० ते २५ टक्के शेअर मार्केटमध्ये तर ७५ ते ८० टक्के डब्बा व्यापारात पैसे लावत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. कोणतीही लिखापढी नाही, त्यामुळे कोणताच कर नाही अन् डर नाही, अशी भावना झाल्यानेच बेकायदेशीर डब्बा मार्केटने शेअर मार्केटला मागे टाकले आहे.अन्नधान्य, तेल, सोने,चांदीपासून बिसलरीच्या बाटल्यापर्यंतच्या चिजवस्तूंवर डब्बा व्यापारी सट्टेबाजी करतात. क्रिकेट सट्ट्याच्या तुलनेत डब्बा सट्टेबाजी प्रचंड मोठी असून, या सट्टेबाजीत मोठमोठे व्यापारी तसेच धनिकबाळ गुंतल्याने क्रिकेट सट्ट्याच्या तुलनेत डब्ब्यातील सट्टेबाजीची रक्कमही कितीतरी कोटीने पुढे आहे. (प्रतिनिधी)
डब्बा व्यापारात डी कंपनी ?
By admin | Published: May 15, 2016 2:34 AM