नागपूर : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु, ज्या बालकांच्या फक्त वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा बालकांनी काय करायचे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरपले आणि पालक म्हणून केवळ आई असलेल्या जिल्ह्यातील ३८३ बालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्यांना (१८ वर्षांच्या आतील बालकांना) मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु, ज्या बालकांच्या केवळ वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा बालकांनी काय करायचे? कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरपल्याने पालक म्हणून केवळ आई असलेल्या बालकांना कोण आणि कोणती मदत करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे १८ वर्षांच्या आतील ४७६ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३८३ बालकांच्या वडिलांचा आणि ८७ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण, वडील नसलेल्या बालकांचीही व्यथा वाईट आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण - १,४२,३४६
बरे झालेले रुग्ण- १,३८,१८७
उपचार सुरू असलेले रुग्ण - १,४५८
एकूण मृत्यू - २,२९७
- मुलांचे भविष्य खुणावतेय
त्यांना खासगी नोकरी होती. मी सुद्धा छोटे-मोठे काम करून कुटुंबाला हातभार लावत होते. दोन मुले आणि आम्ही दोघे असे चौघांचे दोन वेळेचे पोट सहजतेने भरत होते. एक दिवस ते आजारी पडले, ताप उतरतच नव्हता. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, दोन दिवस घरीच उपचार केला. पण ते अत्यवस्थ झाले. रुग्णालयात भरती केले; मात्र वाचू शकले नाहीत. घरचा माणूस गेल्याने आम्ही उघड्यावर आलो आहे. दोन मुले आहेत, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
- कर्ता माणूस जाणे म्हणजे संकटच कोसळणे होय
ते शिक्षक होते आणि खूप खंबीरही होते. पण नकळत त्यांना कोरोना झाला. ऑक्सिजन लेव्हल ९२ होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. कसेबसे बेड मिळाला पण; आठवड्याभरातच ते गेले. पाठीशी एक मुलगा, मुलगी आहे. त्यांचे शिक्षण अजूनही व्हायचे आहे. कर्ता माणूस गेल्यावर भरपूर अडचणी येतात.
बालसंगोपन योजनेचा आधार मिळणार!
कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा आधार देण्यात येणार आहे. एकल पालक असलेल्या पात्र बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत दरमहा ११०० रुपयांप्रमाणे मदतीचा लाभ मिळू शकतो.