संध्या गोतमारे : माजी कुलगुरूंना भावपूर्ण आदरांजली नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांचे व्यक्तिमत्त्वच अद्वितीय होते. अचूक निर्णयक्षमता आणि ठोस भूमिका हे त्यांचे महत्त्वाचे गुण होते. आजवर जे मोठमोठ्यांना जमले नाही ते त्यांनी सहज शक्य करून दाखविले. त्यांच्या जीवनचरित्रातून नवीन पिढीने आदर्श घ्यावा, अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गोतमारे यांनी दादासाहेब काळमेघ यांना आदरांजली अर्पण केली.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानतर्फे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस.टी.देशमुख, जेष्ठ पत्रकार नासुप्र विश्वस्त अनंत घारड हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते.दादासाहेब यांनी शून्यातून सुरुवात केली होती व कामाप्रती त्यांची अपार निष्ठा होती. त्यांनी शिक्षणक्षेत्राचा दर्जा टिकवून ठेवण्यावर भर दिला होता. गावातल्या तरुणांदेखील शिक्षण मिळावे, अशी त्यांची धडपड होती. अखेपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासले असे मत एस.टी.देशमुख यांनी व्यक्त केले. फारच कमी लोक मुळातच नेते म्हणून जन्माला येतात. दादासाहेब हे त्यातलेच होते. त्यांच्यासाठी व्यवहाराच्या व्याकरणासोबतच आचरणाला महत्त्व दिले जायचे. ते कार्याने अमर झाले या शब्दांत श्रीपाद अपराजित यांनी त्यांच्या कार्याचा आठव केला. संस्थेचे अध्यक्ष शरद काळमेघ यांनी दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतींना उजाळा दिला. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गंगाधर वकील, सचिव हेमंत काळमेघ हेदेखील उपस्थित होते. यावेळी डॉ.रवंीद्र शोभणे यांनी एका कवितेतून दादासाहेब काळमेघांना श्रद्धांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)
दादासाहेब काळमेघ नवीन पिढीसाठी आदर्श
By admin | Published: July 31, 2014 1:07 AM