- आनंद डेकाटेनागपूर - कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी बिडी कामगारांकरिता संसदेत बिडी कायदा पारित करून घेतला. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज उभारण्याकरिता पुढाकार घेतला, रिपब्लिकन पक्षाची बांधणी केली. बौध्दांना अनुसुचित जाती मध्ये समाविष्ट करण्याकरिता १४ दिवसाचे आमरण उपोषण केले, अशा पध्दतीने कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्याकरिता महत्वपूर्ण याेगदान दिले, असे प्रतिपादन भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील दादासाहेब कुंभारे परिसरात कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी समारोप समारंभ पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री एड. सुलेखा कुंभारे होत्या. यादरम्यान शांतिमार्च काढण्यात आला. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब कुंभारे यांनवा अभिवादन करण्यात आले.
यावेळी बौध्द धम्माच्या प्रचार आणि प्रसार करिता संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व दादासाहेब कुंभारे यांच्या निकटवर्तीय असलेले भदंत आर्य नागाजुर्न सुरई ससाई यांना यांचा चिवरदान, मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक पुरण मेश्राम, साहित्यीक इ.मो. नारनवरे, विनायक जामगडे, राष्ट्रपाल मेश्राम, भदंत नागदिपंकर थेरो, भदंत डॉ. चिंचाल मेत्तानंद, भदंत प्रज्ञाज्योती, ज्योतीबोधी उपस्थित होते. संचालन राहुल बागडे यांनी केले तर देवेंद्र जगताप यांनी आभार मानले.