नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीलामुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. 30 एप्रिलनंतर सुटका झालेल्या दिवसापासून पुढील 28 दिवसांसाठी ही रजा असेल, असे निर्देश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले होते. मात्र, डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल रजेवर आज सुटका झाली. त्यामुळे आजपासून पुढील 28 दिवसांसाठी डॅडी मुक्तपणे संचार करेल. मुंबईतील भायखळ्यात डॅडी फिरताना दिसणार आहे.
29 एप्रिल रोजी मुंबईत लोकसभा निवडणुका होत्या. जर अरुण गवळीला संचित रजा दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा युक्तिवाद राज्य शासनातर्फे न्यायालयासमोर करण्यात आला. तर याअगोदर जेव्हा जेव्हा गवळीला ‘पॅरोल’ किंवा ‘फर्लो’वर सोडण्यात आले आहे, त्याने कुठल्याही नियमांचा भंग केलेला नाही किंवा कायदा-सुव्यवस्थेला ठेच पोहोचेल असे कृत्य केलेले नाही, अशी बाजू बचावादरम्यान अधिवक्ता राजेंद्र डागा आणि मीर नगमान अली यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर म्हणजेच 30 एप्रिलनंतर गवळीची संचित रजा मंजूर केली होती. त्यानुसार, आजपासून डॅडी तुरुंगाबाहेर आला आहे. नागपूर तुरुंगातून बाहेर येताच, अरुण गवळी मुंबईकडे रवाना झाला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्याच्या आरोपात गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. काही दिवसांअगोदरच गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी तुरुंग प्रशासनाकडे संचित रजेचा अर्ज केला होता. मात्र प्रशासनाने अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.