लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : पेट्रोलपंपावरील डिस्पेन्सर युनिटमध्ये असलेल्या पल्सर कार्ड आणि कंट्रोल कार्डमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या संशयावरून नागपूर-काटोल मार्गावरील दहेगाव पेट्रोलपंपावर ठाणे क्राईम ब्रांचने धाड टाकली. तेथील चारपैकी तीन युनिटमध्ये फेरफार केल्याचे लक्षात येताच पल्सर चिप जप्त करण्यात आली. ठाणे गुन्हे शाखा, वजनमाप विभाग आणि पेट्रोलियम विभागाच्या चमूने संयुक्तपणे ही कारवाई रविवारी सकाळच्या सुमारास केली. तीन युनिटमधील एक्स्ट्रा फिटींग ही मदरबोर्डमध्ये केल्याने ग्राहकांना पेट्रोल वा डिझेल कमी मिळत होते. याच पंपावरून स्टार बसमध्ये इंधन भरले जाते, हे विशेष.दहेगाव येथील हा पेट्रोलपंप पुष्पा नटवरलाल मुंदडा (रा. नागपूर) यांच्या मालकीचा इंडियन आॅईल कंपनीचा श्रीराम नारायणदास सर्व्हे नावाने हा पंप आहे. सदर पंप त्यांचा मुलगा आशुतोष चालवितो. ठाणे क्राईम ब्रांचने मुख्य आरोपी प्रकाश नुलकर (मुंबई) याला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या चिप व एक्स्ट्रा फिटींग व माहितीवरून पल्सर कार्डमध्ये फेरफार करणाºया क्लेफर्ड थॉमस, सुरेश टेकाडे, मनीष वºहाडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी पोलिसांना दिलेल्या कबुलीवरून नागपूर जिल्ह्यातही पल्सर चिपमध्ये फेरफार, एक्स्ट्रा फिटींग केल्याचे उघड झाले होते.दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांचने नागपूर जिल्ह्यात लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी कळमेश्वरातील देवेन आॅटोमोबाईल पंपावर धाड टाकली. तर रविवारी दहेगाव येथील पेट्रोलपंपावर केलेल्या कारवाईत तीन युनिटमध्ये एक्स्ट्रा फिटींग केल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान कोणत्याही युनिटवर फसवणूक केली जात नसल्याचे सांगून पथकाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अधिकाºयांनी एका युनिटमधून भांड्यात पेट्रोल घेऊन लिटरच्या मापाद्वारे मोजमाप केले असता पेट्रोल कमी असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे त्या युनिटमधील मदरबोर्ड आणि पल्सर कार्डची तपासणी करण्यात आली. त्यात छेडछाड करण्यात आल्याचे स्पष्ट होताच ते जप्त करून पेट्रोलपंपावरील तीन युनिट सील करण्यात आले.ही कारवाई ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस उपनिरीक्षक माने, पी. एन. कांबळे, सैयद यांनी पार पाडली.
दहेगावच्या पेट्रोलपंपावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:20 AM
पेट्रोलपंपावरील डिस्पेन्सर युनिटमध्ये असलेल्या पल्सर कार्ड आणि कंट्रोल कार्डमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या संशयावरून
ठळक मुद्देतीन युनिटमध्ये गडबड : ठाणे क्राईम ब्रांचची कारवाई