गोविंदा आला रे...नागपूर : जन्माष्टमी म्हटले की लोकांमध्ये दहीहंडी स्पर्धेचा वेगळाच उत्साह संचारतो. उंचावर असलेली दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोविंदा पथकांचे साहस आणि गोविंदा आला रे...ची आरोळी देत तेवढ्याच उत्साहात सहभागी होणारे दर्शक. साहसाचे असेच उत्साही दृश्य शहरातील इतवारी येथे इतवारा नवयुवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी स्पर्धेच्या वेळी दिसले. एक, दोन, तीन, चार...म्हणत गोविंदा पथकांनी जीवाची बाजी लावत दही-दुधाची मटकी फोडून लाखोंच्या बक्षिसाला गवसणी घातली. इतवारा नवयुवक मंडळातर्फे पुरुष आणि महिला पथकांसाठी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुनील केदार, नासुप्र सभापती श्याम वर्धने, गिरीश व्यास, मंडळाचे संजय खुळे, अभिषेक लुनावत प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मंडळाच्या स्पर्धेला भेट देऊन मंडळ सदस्यांना व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटन समारंभ पार पडताच उंच साहसाचा हा उत्साही खेळ सुरू झाला. आसपासच्या परिसरातून हजारो लोक दहीहंडीच्या उत्साहात सहभागी झाले होते. गोविंदा आला रे...,हर तरफ है ये शोर...,अशा गीतांवर डीजेचे संगीत लोकांचा उत्साह वाढवित होते. यात दहीहंडीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोविंदांवर कार्यकर्त्यांकडून पाण्याचा वर्षाव होत होता. यातच उंचापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न फसला की, नाचत गाजत परतणाऱ्या गोविंदा पथक पुढच्या प्रयत्नासाठी सज्ज राहत होते. सर्वत्र हा उत्साह ओसंडून वाहत होता. दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले गोविंदा पथक ातील सदस्य थरावर थर करुन दहीहंडीच्या उंचीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्यावर चहुबाजूंनी पाण्याचा मारा होत होता. एकामेकावर चढलेल्या गोविंदावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या असतांना एखादा सदस्य घसरला की, सर्वांच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखा होत होता.(प्रतिनिधी)महिलांमध्ये जयदुर्गा चमू विजेतास्पर्धेमध्ये महिलांच्या सहा चमू सहभागी झाल्या. यामध्ये पेठे टायगर हिवरीनगर, जयदुर्गा क्रीडा मंडळ सोनेगाव, केशवनगर माध्यमिक विद्यालय जगनाडे चौक, शिवसंस्कृती महिला क्रीडा मंडळ व साईबाबा क्लबचा समावेश होता. महिला पथकांसाठी दहीहंडी ३० फुटावर ठेवण्यात आली. महिला पथकांनी पाचवेळा प्रयत्न केले. त्यानंतर दहीहंडीची उंची २५ फूट व त्यानंतर २० फूट करण्यात आली. पाच प्रयत्नानंतर सोनेगावच्या जयदुर्गा क्रीडा मंडळाच्या चमुने दहीहंडी फोडण्यात यश मिळविले. विजेत्या चमूला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. विजेता चमूमध्ये उषा तळखंडे, सुनिता हातमोडे, कविता सोमलकर, सुगिता कुरझुडे, अंकिता मोडक, छबी उईके, मोनाली मेश्राम, अश्विनी नागोत्रा, किरण कटोले, प्रियंका गजभिये यांच्यासह ४० सदस्यांचा समावेश होता.पुरुषांमध्ये जय भोलेश्वर चमू ठरले विजेतेपुरुष गटांमध्ये शहरातील सहा पथकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जय भोलेश्वर क्रीडा मंडळ सोनझरी, जय मॉ शितला नृत्य कला मंडळ धम्मदीपनगर, जय मॉ काली क्रीडा मंडळ बिडीपेठ, गोल्डन स्पोर्टींग क्लब जुना बगडगंज, पेठे टायगर क्रीडा मंडळ व केशवनगर माध्यमिक विद्यालय यांचा समावेश होता. पुरुष गटासाठी दहीहंडीची उंची ३३ फूट ठेवण्यात आली होती. ही उंची नंतर कमी करून ३० फूटावर आणण्यात आली. यावेळी जय भोलेश्वर क्रीडा मंडळ सोनझरीचे गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यात यशस्वी ठरले. विजेता पथकाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
साहस, उत्साहात रंगला दहीहंडीचा सोहळा : इतवारा नवयुवक मंडळाचे आयोजन
By admin | Published: September 07, 2015 2:53 AM