बजाजनगर ते लोकमत चौक मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
नागपूर : बजाजनगर चौकाकडून लोकमत चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे चांगलाच खोळंबा झाला.
शहराचे मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदासपेठ व धंतोली परिसरात वाहनांच्या पार्किंगची भीषण समस्या आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांचे वाहन रामदासपेठ, धंतोली परिसरात जागोजागी पार्क झालेले बघायला मिळतात. या परिसरात पार्किंगची भीषण समस्या निर्माण झाली आहे. लोकमत चौक ते बजाजनगर दरम्यानच्या रोडवर दवाखाने, हॉटेल्स आहेत. या रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग केले जाते. पायी चालणाऱ्यांसाठी असलेला फुटपाथही पार्क झालेल्या वाहनांच्या कचाट्यात येतो. मुख्य रस्ताच नाही, तर रामदासपेठ व धंतोलीतील गल्लीबोळीतसुद्धा चारचाकी वाहनांची पार्किंग केले जाते. वाहतूक विभागाचे कर्मचारी परिसरात नो पार्किंगची कारवाई करतात. तरीसुद्धा वाहने पार्क केली जातात. मंगळवारी दुपारी लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाही चौकात वाहतूक कर्मचारी दिसून आला नाही. ही वाहतूक सुरळीत व्हायला किमान तासभराचा वेळ लागला. या परिसरांमध्ये होणारी वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अॅम्ब्युलन्सचे आवाज, वाहनांची वर्दळीमुळे येथील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.