नागपूर : बाटली बंद पिण्याचे पाणी महाग आणि दूध स्वस्त अशी परिस्थिती राहिल्यास दूध उत्पादनात वाढ कशी होईल? दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळाले तर आपोआप शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे कल वाढेल. त्यामुळे दुधाला चांगला दर मिळण्यासाठी बाजारपेठेत दुधाची मागणी वाढणे आवश्यक आहे. याकरिता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व मदर डेअरीच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी नागपुरात केली.
नागपुरात २४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या ॲग्रो व्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीअंतर्गत ‘विदर्भातील डेअरी उद्योगाचा विकास’ या विषयावर शनिवारी झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. दुग्धव्यवसायात वाढ करण्याबाबत राज्य स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र देशात दुधाची भुकटी तयार करणारा मोठा प्रदेश आहे. डेअरी इंडस्ट्रिज आता ग्लोबल होत असून अनेक मोठ-मोठ्या कंपन्या या व्यवसायाचे नेतृत्व करीत आहे. विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे केदार म्हणाले.
विदर्भात दुग्ध यातून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोठी संधी आहे. दुधाच्या उत्पादनाला विदर्भात वाव असला तरी शेतकऱ्यांपुढे असलेल्या समस्या अधिकाऱ्यांनी समजून त्या दूर कराव्या. मार्केटिंग आणि प्रोसेसिंग महत्त्वाचे असल्याने ही सुविधा दूध उत्पादकांपर्यंत पोहचविण्यात अधिकाऱ्यांनी कमी पडू नये, अशी अपेक्षा केदार यांनी व्यक्त केली.
दुधाचा टक्का अजूनही मागे : गडकरी
दूध उत्पादनातील विदर्भाचा टक्का अजूनही मागे असल्याची खंत ॲग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात दुधाने क्रांती होण्याची गरज आहे. त्यासाठी नव्या प्रजातीच्या आणि अधिक दूध देणाऱ्या गायींची पैदास वाढायला हवी, असे गडकरी म्हणाले.
विदर्भात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, मदर डेअरी आणि राज्य शासनाच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाला अधिक गती देऊन प्रत्येक गावामध्ये मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलन करण्यासाठी प्रयत्न करावे. आगामी काळात विदर्भात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, मदर डेअरी यांनी अधिक प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशा सूचना गडकरी यांनी केल्या.
राज्याचे दूध संकलन ५ लाख लिटरवर पोहचवायचेय : मिनेश शहा
राज्याचे दूध संकलन सख्या २ लाख लिटर प्रतिदिन आहे. ते ५ लाखावर पोहचविण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी विदर्भावरही अधिक भर राहणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दुधाचा जोडधंदा महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दूध विकास मंडळाचे अध्यक्ष मिनेश शहा यांनी केले.
शहा म्हणाले, राष्ट्रीय दूध विकास मंडळाने २०१६ पासून विदर्भासाठी योजना सुरू केली. विदर्भातील ५ आणि मराठवाड्यातील ६ अशी १२ गावे प्रारंभी या योजनेत जोडली. आज विदर्भातील ७ आणि मराठवाड्यातील ४ असे ११ जिल्हे व त्यातील २,७०० गावे या योजनेत सहभागी आहेत. एक कोटीवर रक्कम या प्रकल्पावर खर्च झाली असून १४ हजार ७०० शेतकऱ्यांना या योजनेला लाभ झाल्याची माहिती त्यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील ४० गावांमध्ये राबविलेल्या पायटल प्रोजेक्टमधून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढल्याचे लक्षात आल्याने विदर्भातील ४०० पेक्षा अधिक गावे या योजनेत सहभागी केली जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले.