लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरस्वती पूजन असाे की सरस्वती सन्मान असाे, हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा, प्रतीकांची हेटाळणी करण्यात आता अर्थ नाही. या प्रतीकांची अवहेलना करण्यात पूर्ण पिढी संपून जाते. हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपले प्रश्न काय आणि ते कसे साेडविता येतील, याकडे दलितांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त साहित्यिक डाॅ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले. (Dalits should not spend time opposing Hindu symbols)
सरस्वती पूजनाच्या कारणावरून ज्येष्ठ साहित्यिक, कवी यशवंत मनाेहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा सत्कार नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर संघाचाच सत्कार स्वीकारणाऱ्या डाॅ. लिंबाळे यांनी हे विधान केले. यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीदरम्यान दलित आणि सवर्णांमध्ये दरी निर्माण झाली असून, ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दलितांचे प्रश्न दलितांनीच साेडवावे असे नाही, तर सवर्णांनीही ते साेडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जातीच्या पलीकडे जाऊन माणूसपणाची संवेदना का विसरता, असा सवाल त्यांनी केला. पूर्वीप्रमाणे आता व्यक्ती किंवा समाजाकडून अत्याचार हाेत नाही तर सामुदायिक शाेषण हाेत आहे व त्याविराेधात दलित व सवर्णांनी एकत्रित येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सध्या दलित, आंबेडकरी साहित्यात साचलेपणा आला आहे. पूर्वी जाेरकसपणे चळवळी चालायच्या. त्या प्रश्नांना घेऊन दलित साहित्य भिडत असे. आता चळवळी बंद झाल्या आणि साहित्यही थांबले. आता नव्या प्रश्नांवर दलित चळवळी उभ्या झाल्या की दमदार साहित्य निर्माण हाेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आज पुराेगामी समाज संपला की काय, असे वाटते. कारण, पुराेगामी विचारांची माणसे शाेधावी लागतात, अशी खंत डाॅ. लिंबाळे यांनी व्यक्त केली. सरसकट सवर्णांचा विराेध करणे याेग्य नाही. कारण, सवर्णांमधील पुराेगामी लाेकांचा विराेध करता येत नाही. मात्र, दलित साहित्याची सवर्ण आणि दलित लेखकांकडूनही समीक्षा हाेत नसल्याची खंत डाॅ. लिंबाळेंनी व्यक्त केली. वृषाली देशपांडे आणि ॲड. स्नेहल शिंदे यांनी डाॅ. लिंबाळे यांची मुलाखत घेतली. वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र शाेभणे यांनी प्रास्ताविक केले इंद्रजित ओरके यांनी आभार मानले.
सवर्णांपेक्षा दलितांचे साैंदर्यशास्त्र श्रेष्ठच
दलितांचे व सवर्णांचे साैंदर्यशास्त्र वेगवेगळे असते. सवर्णांचे साैंदर्यशास्त्र आनंदावर अवलंबून असते. मात्र, दलितांचे साैंदर्यशास्त्र अन्यायाची अस्वस्थता मांडणारे असते. ‘बलुतं’, ‘उपरा’ वाचून आनंद नाही, अस्वस्थता निर्माण हाेईल. भगतसिंगांचे साैंदर्यशास्त्र हे देशाच्या स्वातंत्र्यात हाेते. दलितांचे साैंदर्यशास्त्र अन्याय, अत्याचाराविरुद्ध क्रांती निर्माण करणारे आहे. स्वातंत्र्याचा विचार कधीही आनंदाच्या साैंदर्यशास्त्रापेक्षा श्रेष्ठ असताे, अशी भावना डाॅ. लिंबाळे यांनी व्यक्त केली.
दलित शब्दाला विराेध कशासाठी?
दलित हा शब्द शाेषित, पीडित, पिचलेल्या, अन्यायग्रस्त समाजाचे प्रतीक आहे. दलित हे ब्राह्मण किंवा कुठल्याही समाजाचे असू शकतात. या शब्दावर इतकी वर्षे चळवळ उभी राहिली व चालली आहे. या भरवशावरच अन्यायाला वाचा फाेडली गेली, त्या शब्दाला विराेध कशासाठी, असा सवाल करीत त्यांनी दलित शब्दाला विराेध करणाऱ्यांचा समाचार घेतला.