लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कटीपहाडी भागात राेडवर माेठा खड्डा तयार झाला. या खड्ड्यातून वाहने गेल्याने लागाेपाठ १० वाहनांचे टायर फुटले. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून काेंढाळी पाेलिसांना या खड्ड्याजवळ रात्रभर पहारा द्यावा लागला.
शनिवारी मध्यरात्री २.१५ ते ३ वाजताच्या दरम्यान अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या लेन कटीपहाडी नजीक नवरदेवाच्या कारसह एकूण १० वाहनांचे लागाेपाठ टायर फुटले. त्यामुळे नागरिकांनी याबाबत ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांना माहिती दिली. लुटमार करण्याच्या हेतूने तर कुणी वाहनांचे टायर फाेडत नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात हाेती. त्यामुळे विश्वास पुल्लरवार यांच्यासह सहकाऱ्यांनी तातडीने कटीपहाडी परिसर गाठला.
पाेलिसांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना राेडवर माेठा खड्डा तयार झाला असून, त्या खड्ड्यातून वाहनाचे चाक जाताच टाेकदार काठामुळे टायर फुटत असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी तातडीने उपाययाेजना करण्यासाठी पाेलिसांनी अटलांटा (बालाजी) कंपनीचे व्यवस्थापक बेग यांच्याशी फाेनवर वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.
हा खड्डा अंधारात वाहनचालकांच्या लक्षात यावा म्हणून तिथे रिफ्लेक्टर लावणे आवश्यक हाेते. पण, ते लावणार काेण, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पोलीस नायक किशोर बोबडे व संतोष राठोड यांनी सकाळपर्यत खड्ड्याजवळ थांबून पहारा दिला. त्यानंतर रविवारी (दि. २०) दुपारी हा खड्डा बुजवण्यात आला. दुसरीकडे, या महामार्गावर तयार झालेल्या इतर जीवघेण्या खड्ड्यांचे काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
...
अपघातांना निमंत्रण देणारे खड्डे
या महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम अटलांटा (बालाजी) नामक कंपनीने केले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि त्यांना राजकीय नेत्यांचा छुपा पाठिंबा यामुळे या मार्गाच्या कामावर सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह निर्माण हाेत गेले. परिणामी, या महामार्गावर अल्पावधीतच खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. या मार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग सुसाट असल्याने खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत.