लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, फळपिके आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाले असून, पावसाने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी आणि उमरेड या चार तालुक्यांना अवकाळीचा अधिक फटका बसला आहे. यंदाच्या हंगामात नागपूर जिल्ह्यात रबीमध्ये १८ हजार ९१०६.८१ हेक्टरवर लागवड झाली. सर्वाधिक पेरा हरभरा पिकाचा ८९ हजार ४०९.२१ हेक्टरवर झाला. त्यापाठोपाठ गव्हाची लागवड ८६ हजार ६८६.३५ हेक्टरवर करण्यात आली आहे.
जिल्ह्यात यंदा उन्हाळी हंगामातही चांगली पेरणी झाली. १६ मार्चअखेर ३,७४२.७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.
१७ ते २१ मार्चदरम्यान पाच दिवस जिल्ह्यात पाऊस आला. मार्च महिन्यातील सरासरी पाऊस १४.५ मिमी नोंदविला जातो. मात्र या पाच दिवसाच्या काळात सरासरीपेक्षा अधिक १७.६९ मिमी पाऊस पडला. वादळी वारे, गारा, विजा यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले.
कळमेश्वर तालुक्यात डोरली गंगा, दहेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस आणि गारपीट झाली. या तालुक्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे ३३ टक्के नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. पारशिवनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोसंबी पिकांचे २० ते ३० टक्के नुकसान झाले आहे. यासोबतच उमरेड तालुक्यातही ५ ते १० टक्के गव्हाचे नुकसान झाले. जोराच्या वाऱ्यामुळे गहू मोडला. फळपिकांचे व भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले. सावनेर तालुक्यातही फळगळ झाली. यामुळे पिकाची टक्केवारी घटणार आहे. वादळामुळे पिकांचे नुकसान अधिक आहे.
गव्हाची गुणवत्ता घटली, हरभरा अंकुरला
सततच्या पावसाचा गव्हावर विपरीत परिणाम झाला. पावसात सापडल्यामुळे दाना भिजला. त्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. गहू पांढरट पडणार असल्याने दरावरही परिणाम पडणार आहे. ५ ते १० टक्क्यांपेक्षा अधिक गुणवत्ता बाधित झाली आहे. यासोबतच हरभरा गळाला आहे. अनेक शेतातील माल काढणीला आला होता. मात्र पावसात सापडल्याने दाना अंकुरला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हा माल वाया गेला आहे.