लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यात झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे संत्र्याचे अताेनात नुकसान झाले. तेलगाव शिवारात संत्र्याची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखाेंचे नुकसान झाले. भाजीपाला पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. हातचा शेतमाल पावसाने हिरावून नेल्याने पुन्हा शेती करताना पैशाची जुळवाजुळव कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर उभा ठाकला आहे.
तेलगाव शिवारात खरीप पिकांसाेबतच कारली, दाेडके व इतर भाजीपाला पिके शेतकरी घेतात. तेलगाव येथील शेतकरी शंकर पेठे यांनी यावर्षी तीन एकरात कारली, दोडकी लागवड केली. पिकाच्या मशागतीवर बराच खर्चही केला. यातून येणाऱ्या उत्पादनातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साेय हाेईल, अशी आशा असताना एकाच दिवसाच्या मुसळधार पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. तीन एकरातील वेलवर्गीय भाजीपाला तसेच शंकर पेठे व नीलेश ताजने यांच्या बागेतील १०० वर संत्रा झाडे उन्मळून पडली. यामुळे त्यांचे अंदाजे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी काेराेनामुळे शेतमालाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. भाजीपाला मार्केट, चिल्लर भाजी विक्रीवर लावलेल्या निर्बंधांमुळे नगदी पीक म्हणून समजल्या जाणारा भाजीपाला कवडीमोल विकावा लागला. या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवला. यंदा पुन्हा नव्याने शेतात राबविण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी झालेला तोटा यावर्षी भरून निघेल असे स्वप्न उराशी बाळगून जवळ असलेली जमापुंजी पुन्हा शेतात खर्च घातली. परंतु शेतातील पीक भुईसपाट झाल्याने आता नव्याने शेती करायची कशी असा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाकडून मिळणारी मदत हे नुकसान झालेल्या पिकाच्या तुलनेत अत्यल्प मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघणार नसल्याचे मतही शेतकरी शंकर पेठे यांनी व्यक्त केले.