कन्हानमधील दरोड्याचा छडा : पिस्तूलसह दरोडेखोर गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क कन्हान / नागपूर : कन्हान शहरातील सराफा दुकानात १४ मे रोजी पडलेल्या दरोड्याचा छडा लावून चार दरोडेखोरांसह त्यांना आश्रय देणाऱ्याच्याही मुसक्या बांधण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनी यश मिळवले. योगेश फुलसिंग यादव (२५, रा. कन्हान, ता. पारशिवनी), आर्येन ऊर्फ नीतेश मुन्नेलाल राठोर (२४, रा. कन्हान, ता. पारशिवनी), जितेंद्र ऊर्फ भुरू मारुती धोटे (३८, रा. रामनगर, गोंदिया), समीर रमाकांत लुटे (२३, रा. गांधी वॉर्ड रामटेक) आणि प्रफुल्ल ऊर्फ पीयूष अंबादास जांगडे (२५, रा. शिवनगर, रामटेक) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यातील योगेश यादव हा या दरोड्याचा मुख्य सूत्रधार आहे. बहिणीच्या लग्नासाठी आवश्यक असलेले सोन्याचे दागिने सराफा व्यापारी अमित गुप्ता यांनी उधार देण्यास नकार दिल्यामुळे त्याने सूडाच्या भावनेने हा दरोडा घातल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांनी आज सोमवारी पत्रकारांना दिली. गणेशनगरातील अमित ज्वेलर्समध्ये रविवारी , १४ मेच्या दुपारी २ वाजताच्या सुमारास चार दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालून २१ लाख ४२ हजारांचा ऐवज लुटून नेला होता. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात सराफा व्यावसायिक अमित गुप्ता जबर जखमी झाले होते. या दरोड्यामुळे नागपूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. दरोडेखोर दोन मोटरसायकलींवर आले होते. त्यांनी आपल्या मोटरसायकल बाजूलाच उभ्या केल्या होत्या. दरोड्याचा संपूर्ण घटनाक्रम दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याआधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेणे सुरू केले. त्यानुसार, पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वात आठ विशेष तपास पथके तयार केली. सोबतच सायबर सेलच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. अन् धागा मिळालातपास पथकाने महामार्गावरून पळालेल्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातच नव्हे तर शेतातही विचारपूस सुरू केली. अशाच प्रकारे एका शेतातील गुराख्याला विचारपूस करताना त्याने महत्त्वाची माहिती दिली. कन्हान शहराबाहेर पडल्यानंतर दरोडेखोरांनी आपल्या तोंडावरचे स्कार्फ काढले आणि रामटेककडे पळाले. ते गुराख्यांनी बघितले. त्यांचे वर्णनही गुराख्याने पोलिसांना सांगितले. हा दुवा पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला. त्यानंतर रामटेकसह आजूबाजूच्या भागातील गुन्हेगारांची यादी शोधली अन् संशयाची सुई योगेश यादवकडे फिरली. त्याला ताब्यात घेताच सारा घटनाक्रमच स्पष्ट झाला. त्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री गोंदियातील सूर्याटोला भागातून मुख्य सूत्रधार योगेश तसेच आर्येन आणि या दोघांना आश्रय देणाऱ्या जितेंद्रला ताब्यात घेतले. दुसऱ्या एका पथकाने समीर आणि प्रफुल्ल या दोघांना रामटेकमधून ताब्यात घेतले. या दरोड्याचा छडा लावून दरोडेखोरांच्या मुसक्या बांधण्यात अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पुरुषोत्तम अहेरकर, लक्ष्मीप्रसाद दुबे, राजेश सनोडियार, सूरज परमार, अजय तिवारी, शैलेष यादव, चेतन राऊत, अमोल कुथे, सचिन किनेकर, संगीता वाघमारे, अमोल वाघ , उमेश मोहुर्ले, सचिन सलामे, कमलाकर कोहळे, राजकुमार सातूर, कार्तिक पुरी, मदन आसतकर, दिलीप लांजेवार, प्रणय बनाफर, नीलेश बर्वे यांनी बजावल्याची माहितीही बलकवडे यांनी पत्रकारांना दिली. दरोडा घालून काशीत गंगास्नान हा दरोडा घातल्यानंतर सर्व दरोडेखोरांनी रेल्वेने काशी (वाराणसी, उत्तर प्रदेश) गाठले. तेथे दोन दिवस मुक्काम केल्यानंतर ते गोंदियाला परतले आणि जितेंद्र धोटेकडे मुक्काम ठोकला. त्यानंतर त्यांनी दरोड्यातील रोख रकमेची वाटणी करून घेतली. सूत्रधार यादवने दरोड्यात वापरण्यासाठी मध्य प्रदेशातून प्रत्येकी २० हजार रुपयांमध्ये पिस्तूल विकत घेतले होते. दुसरा दरोडेखोर पीयूष जांगडे हा एका हत्याकांडातील आरोपी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दागिने, पाच मोबाईल, २४ हजारांच्या रोख रकमेसह एकूण १२ लाख ८६ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ३०० गुन्हेगारांची झाडाझडती या दरोड्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कन्हानमधील रेकॉर्डवरील जवळपास ३०० आरोपींची झाडाझडती घेतली. त्यातून सूत्रधार कुख्यात गुन्हेगार योगेश यादवचे नाव पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धडक दिली असता तो आढळला नाही. तो बाहेरगावी असल्याचे कुटुंबीय सांगत होते. तर, योगेशच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो गोंदियात दडून असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार, रविवारी गोंदिया शहर गाठून पोलिसांनी त्याच्यासह तिघांच्या तेथे मुसक्या बांधल्या. त्याने नंतर अन्य दोघांची नावे सांगितली. शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आलेल्या पाचही दरोडेखोरांना सोमवारी सकाळी कन्हान पोलिसांच्या स्वाधीन केले. कन्हान पोलिसांनी त्यांना सोमवारी दुपारी कामठी येथील प्रथम श्रेणीन्यायदंडाधिकारी अ. दा. तिडके यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने दरोडेखोरांना शुक्रवारपर्यंत (दि. २६) पोलीस कोठडी मंजूर केली.
दागिने उधार मिळाले नाही म्हणून घातला दरोडा
By admin | Published: May 23, 2017 1:48 AM