नागपूर : मागील काही दिवसांपासून राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विविध आरोप केले जात आहेत. यातच अंजली दमानिया यांनी आपल्याकडे काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे हाती लागले असून त्यात बावनकुळे यांचेही नाव असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात सोमवारी पत्रकारांनी बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी दमानिया यांच्याकडे जे पुरावे आले असतील ते एकदा त्यांनी तपासून घ्यावे आणि नंतरच आरोप करावे, असे स्पष्ट केले. मी इमाने इतबारे काम केले आहे, दमानिया यांच्याकडे पुरावे असतीलच तर त्यांनी ते सादर करावेत, असे आव्हान सुद्धा त्यांनी दिले. याशिवाय त्यांच्या भावाला कंत्राट दिल्याबाबत होत असलेल्या आरोपाबाबत पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, श्री जगदंबा कंस्ट्रक्शन कंपनीचा मी २००४ सालीच राजीनामा दिला आहे. याबाबत काही लोक न्यायालयात सुद्धा गेले आहेत. एखाद्याचा भाऊ मंत्री आहे म्हणून त्याच्या भावाने व्यवसायच करू नये, असे नाही. टेंडर हे आॅनलाईन असते. जी कंपनी पात्र असते तिला ते मिळत असते. व्यवसाय करण्यासाठी मी कुणालाही विरोध करू शकत नाही. त्याने योग्य काम केले नसेल तर चौकशी व्हावी, कारवाई व्हावी. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले. आरोप करणारा व्यक्ती हा एक छोटासा कार्यकर्ता आहे. तो पूर्वी भाजपमध्येच होता. पक्षाच्या नेत्यांना त्याने शिवीगाळ केली होती. पक्षाचा ध्वज जाळला होता. त्यामुळे त्याला पक्षातून मीच काढले होते. काही लोक दुखावलेले असता त्यामुळे आरोप केले जातात. माझ्या वडिलांनी त्यांच्या संपत्तीचे तीन भावांत समान वाटप केले आहे. याबाबत सुद्धा आरोप केले जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आरोप करणारा खूपच लहान कार्यकर्ता असल्याचे आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
दमानिया यांनी पुरावे तपासून आरोप करावेत
By admin | Published: August 09, 2016 2:48 AM