लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मे महिना अर्ध्यात आला आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला केवळ २७० दलघमी(८ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ १५ दलघमी म्हणजे १ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३६ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीसमध्ये ९ टक्के, लोवर नांद २ टक्के, वडगाव प्रकल्पात १८ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २० टक्के, सिरपूर २२ टक्के, पुजारी टोला २१ टक्के, कालिसरार ५० टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ८ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३१ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये १० टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ६ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द, दिना व पोथरा रिकामेभंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ , गडचिरोली जिल्ह्यातील दिना आमि वर्धा जिल्ह्यातील पोथरा हे तिन्ही प्रकल्प पूर्णपणे रिकामे आहेत. गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा क्षमता ७४० दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला पाणीच नाही. तर दिना प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ६८ दलघमी इतकी व पोथरा प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ३५ दलघमी आहे, ही दोन्ही धरणे सुद्धा रिकामीच आहे.मध्यम व लघु प्रकल्पांची स्थितीही बिकटनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. त्यात ९ एप्रिल रोजीपर्यंत केवळ ७६ दलघमी म्हणजेच १४ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघू प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ५४ दलघमी म्हणजेच ११ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.पाच वर्षात सर्वात कमी साठानागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केला असता मागील पाच वर्षात यंदा सर्वात कमी पाणीसाठा आबहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी २०१८ मध्ये २ मे रोजी मोठ्या धरणांमध्ये ८६१ दलघमी इतका साठा होता. २०१७ मध्ये याच तारखेला ४९१ दलघमी इतका पाणीसाठा होता. २०१६ मध्ये ८२१, २०१५ मध्ये ८९१आणि २०१४ मध्ये १५८४ दलघमी इतका साठा होता. आणि यंदा केवळ २७० दलघमी इतका साठा आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी परिस्थिती भयावह झाली आहे.
नागपूर विभागातील धरणे कोरडी : भीषण पाणीटंचाईची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 8:20 PM
मे महिना अर्ध्यात आला आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देकेवळ ८ टक्के साठा