लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंगीबेरंगी प्रकाशव्यवस्थेत डान्स बारमध्ये संगीत वाजते आहे. एका कोपऱ्यात एक महिला तर समोरच्या भागात काही मद्यपी नाचत आहेत. एक-दोन जण नाचणारीवर नोटा उधळत आहे. मध्येच एक जण एका डान्सरला ओढून समोर आणतो आहे. तिच्यासोबत आक्षेपार्ह प्रकार करून नंतर तिला नाचवताना स्वत:ही सिनेस्टाईल नाचतो आहे. कुण्या सिनेमातील हे दृश्य नाही. तर, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे उपराजधानीत खळबळ उडवून देणारी ही क्लीप बुटीबोरीजवळ सुरू असलेल्या एका डान्स बारमधील असल्याचे चर्चेला आले आहे.अधिकृत डान्स बारच्या परवान्याचे घोंगडे अद्याप भिजत पडले असताना नागपूरलगत काही जणांनी ऑर्केस्ट्राच्या आडून चक्क डान्स बार सुरू करून धूम मचविली असल्याचे यातून उघड झाले आहे. अनधिकृत डान्स बारमधील ही क्लीप व्हायरल झाली आहे. पैशाच्या जोरावर धनिक मंडळींनी बार डान्सरशी चालविलेली लगट आणि डान्सर्सवर केली जाणारी नोटांची उधळण या क्लीपमध्ये स्पष्ट दिसत असून, पोलिसांनी मौनीबाबांची भूमिका वठविल्यामुळे सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.राज्य सरकारने २००५ मध्ये डान्स बारवर बंदी घातली. त्यानंतर अनेक डान्स बारमालकांनी आपापल्या दुकानदाºया बंद केल्या. मात्र, काहींनी ऑर्केस्ट्रा परवाना घेऊन मद्यपींच्या मनोरंजनाची सोय केली. मात्र, पाहिजे तशी कमाई होत नसल्याने शहर आणि जिल्ह्यातील काही बारमालकांनी चोरी छुप्या मार्गाने डान्सबार सुरू केले होते. तीन वर्षांपूर्वी आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस या बारमध्ये डान्स होत होता. मात्र, कुणकुण लागताच पोलिसांनी छापे मारल्याने हे डान्सबार बंद झाले होते. काही दिवस गप्प बसलेल्या डान्सबार चालविणाऱ्यांनी नंतर आंबटशौकिन ग्राहकांच्या मागणीवरून अधूनमधून बारमध्ये डान्सचे आयोजन सुरू केले होते. परंतु बारमध्ये पकडल्या जाण्याची भीती असल्याने नोटा उधळणाऱ्या ग्राहकांकडून या छुप्या डान्स बारला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे डान्स बार चालविणाºयांनी नवी क्लृप्ती शोधली होती. नागपूर नजीकचे रिसोर्ट, फार्म हाऊस किंवा बंगल्यात आलटून-पालटून डान्स बार चालविले जात होते. बारच्या थाटात मंद प्रकाश अन् सर्वच प्रकारचे मद्य तसेच खाद्य उपलब्ध करून दिले जात असल्याने, उपराजधानीतील डान्सबारचे आंबटशौकिन ग्राहक तेथे मोठी गर्दी करून लाखोंच्या नोटा उधळू लागले. अशाप्रकारचे अनेक छुपे डान्स बार नागपूर शहराच्या आजूबाजूला सुरू आहेत. मध्यरात्री १ नंतर सुरू झालेली ही ‘डान्स नाईट’ पहाटेपर्यंत सुरू राहते. त्यातून लाखोंची कमाई होत असल्याचे पाहून एका बुकीने चार महिन्यांपूर्वी बुटीबोरीत डान्स बार सुरू केल्याची कुजबुज संबंधित वर्तुळात सुरू झाली होती. ही कुजबुज पोलिसांच्या कानावर गेली नाही की त्यांनी जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले, ते कळायला मार्ग नाही. मात्र, पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नसल्यामुळे डान्स बार चालविणारा बुकी चांगलाच निर्ढावला आहे. त्याने आता परवाना मिळाल्याच्या आविर्भावात अनेक बारबालांना तेथे नाचविणे सुरू केले आहे. या डान्स बारमधील क्लीप शनिवारी व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नियमाचे सर्रास उल्लंघनहाती आलेल्या क्लीपमध्ये आंबटशौकिन धनिक ग्राहकांकडून बार डान्सर्सवर नोटा उधळत असल्याचे दिसत आहे. ऑर्केस्ट्रामधील एक तरुणी गप्प बसली असताना, दोन डान्सर्स ग्राहकांसोबत नाचताना दिसत आहे. हे ग्राहक बार डान्सर्सला स्वत:कडे खेचून त्यांच्यासोबत जबरदस्ती तसेच आक्षेपार्ह प्रकार करीत असल्याचेही या क्लीपमध्ये दिसत आहे. ही क्लीप उपराजधानीत खळबळ उडवून गेली आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून अटी-शर्ती घालून ऑर्केस्ट्रा बारला परवानगी दिली आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश आहेत. त्यानुसार, ऑर्केस्ट्रातील कलावंत कठड्यांच्या (रेलिंग) आत असावे. त्यापासून विशिष्ट अंतरावरच ग्राहकांनी बसावे. महिला गायक डान्स काय, हातवारेही करणार नाही, असे नियम बारमधील ऑर्केस्ट्रासाठी आहेत. मात्र, हे सर्वच नियम धाब्यावर बसविल्याचे क्लीपमध्ये दिसत आहे.पोलिसांच्या चुप्पीमागील ‘राज’!डान्स बारमध्ये नोटांचा अक्षरश: पाऊस पडतो. अवघ्या काही तासात लाखोंचे वारेन्यारे होते. आंबटशौकिन ग्राहकांना दुसऱ्या महानगरात जाण्याची गरज पडत नाही आणि बारमालक, दलालांचे खिसेही काठोकाठ भरतात. त्यामुळे त्यांच्याकडून डान्स बार चालविला जातो. परंतु पोलिसांनी का चुप्पी साधली, ते कळायला मार्ग नाही. या चुप्पीमागचे ‘राज’ जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने बुटीबोरी पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र साहेब रजेवर आहेत, असे सांगून ठाण्यातील मंडळींनी याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. तर, संबंधित पोलीस ठाण्यातील काही ‘जाणकार मंडळींना’ डान्स बारच्या कमाईतून घसघशीत हिस्सा मिळत असल्यामुळेच सारेच जण चुप्पी साधून असल्याची संबंधित वर्तुळात चर्चा आहे.