नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे २० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांची अद्याप ‘आॅनलाईन’ नोंदणी झालेली नसून, ९ सप्टेंबरला त्यांच्यासाठी अखेरची संधी राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.‘एमकेसीएल’सोबत करार झाल्यानंतर विद्यापीठाने परत ‘ई-सुविधा’ सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासोबत ‘आॅनलाईन’ नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. प्रवेशाची अंतिम तारीख २ सप्टेंबर ही होती. या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज जमा केले. परंतु अर्ज जमा झाल्यानंतर आता अनेक महाविद्यालये व शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यासाठी सांगण्यात येत आहे. नियमानुसार हे काम विद्यार्थ्यांचे नसून विभाग किंवा महाविद्यालयांतील संबंधित कर्मचाऱ्यांची आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांत अनेक विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ अर्ज भरता येत नाही. शिवाय विभागांमध्ये ‘आॅनलाईन’ नोंदणीची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना याबाबत सांगण्यात येत आहे. वास्तविकपणे जर विभागांमध्ये ‘आॅनलाईन’ नोंदणीची व्यवस्था नसेल तर ‘आयटी’ विभागाची मदत घेतल्या जाऊ शकते. परंतु कर्मचारी जास्त कामापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांवर ‘आॅनलाईन’ नोंदणी करवून घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. (प्रतिनिधी)अधिकारी माहिती घेणारयासंदर्भात विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी.के. अग्रवाल यांच्याशी संपर्क केला असता ‘आॅनलाईन’ नोंदणीची जबाबदारी महाविद्यालय व विभागांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर कोणी असे करीत नसेल तर त्यांची माहिती घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
२० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात
By admin | Published: September 08, 2015 5:10 AM