* हिंदी महासागराची तापमानवाढ गंभीर वळणावर
* भारतीय उपखंडावर काळजीचे ढग
* समुद्र किनारे गिळणार, आस्मानी संकटे वाढणार
श्रीमंत माने/निशांत वानखेडे
नागपूर : भारतीय उपखंडाला मोसमी पावसाचे वरदान देणारा, जवळपास दोन अब्ज लोकसंख्येचे पोषण करणारा हिंदी महासागर ग्लाेबल वॉर्मिंगच्या दुष्टचक्रात अडकला आहे. जगाच्या अन्य भागांत तापमानवाढीचे संकट किती भयावह असेल ही दूरची गोष्ट पण जगबुडीच्या आधी भारतालाच हवामानबदलाचा अधिक धोका असल्याचे इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या अहवालाने स्पष्ट झाले आहे.
गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राला बसलेला अतिवृष्टी व महापुराचा तडाखा, दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटना, दोन वर्षांपूर्वी केरळमधील हाहाकार, हिमालयातील आस्मानी संकटे हे निसर्गचक्र बिघडल्याचे लक्षणे आहेत. अशा आस्मानी संकटांची वैज्ञानिक कारणमीमांसा आयपीसीसीने हिंदी महासागरातील बदल केंद्रस्थानी ठेवून केली आहे.
या अहवालाने भारतीय उपखंडावर काळजीचे ढग दाटले आहेत. प्रशांत, अटलांटिक किंवा अन्य महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान अधिक वेगाने असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी ३.७ मिलीमीटरने वाढत आहे. सध्याच्या वेगाने एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तीन फुटाने वाढेल व त्यामुळे समुद्रकिनारे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आयपीसीसीसोबत एक टूल तयार केले आहे. त्यात २०२० ते २१५० पर्यंत दर दशकात पृथ्वीवरील समुद्राची पातळी कशी कशी वाढत जाईल व कोणता भाग पाण्याखाली येईल हे कळेल. भारतातील कांडला, ओखा, भावनगर, मुंबई, मुरगाव, मंगलोर, कोची, तुतीकोरीन, चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप, किद्रोपार ही शहरे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
------------------
शंभर वर्षांचे बदल एका वर्षांत
- हिंदी महासागर हा पृथ्वीवरील तिसऱ्या क्रमांकाचा, २० टक्के पाणी सामावणारा महासागर
- तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत दरवर्षी ३.७ मिमी इतकी वाढ
- संपूर्ण एकविसाव्या शतकात समुद्राची पातळी वाढतच जाईल, असा इशारा
- औद्योगिक क्रांतीच्या आधी जे बदल शंभर वर्षांमध्ये घडत होते ते आता एकाच वर्षात
- कार्बन व द्रवरूप धुलिकणांच्या उत्सर्जनामुळे मोसमी पावसाचे वेळापत्रक विस्कळीत
- उत्सर्जन रोखण्यात यश मिळविले तर पावसाचे प्रमाण वाढण्याची भीती