आनंद डेकाटे, मंगेश व्यवहारे,विशाल महाकाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारच्या आवाहनानुसार तीन महिने कडक ‘लॉकडाऊन’ पाळल्यानंतर, सरकारने काहीबाबतीत नियम शिथिल केले. नियमात दिलेल्या शिथिलतेमुळेच कोरोना पॉझिटिव्हची संख्या झपाट्याने वाढायला लागली. लॉकडाऊनमध्ये लोकांची रेंगाळलेली कामे, सरकारच्या तिजोरीवर पडलेला भुर्दंड भरून काढण्यासाठी सरकारने दिलासा दिला. मात्र सोबतच स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहनही केले. त्यामुळे सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांची संख्या वाढली. कामासाठी रांगा लागायला लागल्या, गर्दी वाढली. ही गर्दी पुन्हा कोरोना संक्रमणाचे कारण ठरत आहे. सरकारने नागरिकांबरोबर कर्मचाऱ्यांनाही स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सोबतच काही नियमसुद्धा आखून दिले आहेत. पण या नियमांची सरकारी कार्यालयातही अंमलबजावणी होत नाही. कामासाठी येणाऱ्या लोकांकडूनही नियम पाळले जात नाहीत. लोकमतने शहरातील सरकारी कार्यालयांचा आढावा घेतला असता, सरकारी कार्यालये कोरोनाच्या हायरिस्कमध्ये असल्याचे दिसून आले.
विवाह नोंदणी कार्यालयात गर्दीरजिस्टर्ड मॅरेज करणाऱ्या जोडप्यांची गर्दी अलीकडे वाढत आहे. दररोज जवळपास ३० ते ३५ जोडप्यांचे विवाह येथे होतात. नियमानुसार एका जोडप्यासोबत चार जण आवश्यक आहेत. परंतु तसे होत नाही. अलीकडे विवाह नोंदणी करण्यासाठी पूर्ण कुटुंब व नातेवाईक येतात. सोमवारी या कार्यालयाची पाहणी केली तेव्हा असेच काहीसे चित्र दिसून आले. दीडशेवर लोकांची गर्दी या कार्यालय परिसरात होती. यापैकी बहुतांश लोक मास्क घालून नव्हते. विवाह नोंदणी कार्यालयाच्या आतील परिस्थितीही तशीच आहे. आत फारशी जागा नाही. यातही एका जोडप्याच्या विवाह नोंदणीवेळी कार्यालयात पाय ठेवायलाही जागा नाही. कार्यालयातील कर्मचारी तोंडाला मास्क घालून काम करतात. सॅनिटायझरचीही व्यवस्था आहे. परंतु येणाऱ्या लोकांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालय हे सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काळजी घ्यावयास पाहिजे ती मात्र दिसून येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. पहिला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयालयाजवळ, दुसरा अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि तिसरा मागच्या बाजूने आहे. या तिन्ही दरवाजांतून कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह बाहेरची मंडळी ये-जा करीत असतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्येच हॅण्डवॉशची सुविधा आहे. इतर दोन्ही दरवाजात ती नाही. या हॅण्डवॉशचा उपयोग एखाद दुसरे सोडले तर फारसे कुणी करीत नसल्याचे दिसून आले. थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था येथे नाही. सर्वसामान्य नागरिक बिनधास्तपणे कार्यालयात वावरताना आढळून आले. जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये अलीकडे खुर्च्या दूरवर ठेवून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. परंतु कर्मचारी वर्ग काम करीत असलेल्या ठिकाणी मात्र फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांच्या बसण्याच्या जागा जवळजवळ आहेत. इतर लोक कामानिमित्त आले असता गर्दी आणखी वाढते. परिसरातील अर्जनवीस आणि विविध स्टॅम्प विक्रेत्यांचीही अशीच परिस्थिती आहे. काही मास्क घालून काम करीत होते परंतु अनेकजण मास्क घालून नव्हते. बहुतांश अर्जनविसांकडे सॅनिटायझरची व्यवस्था नाही.नागपूर तहसील कार्यालयनागपूर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात लोक कागदपत्रांसाठी येतात. तहसीलमध्ये तर सर्वच रामभरोसे आहे. अनेक कर्मचारी विना मास्क काम करताना आढळले. इमारतीत प्रवेश करताना सुरक्षारक्षक नव्हता.