लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना न केल्यास कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांना होणारा धुराचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञानी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सण उत्सवामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे प्रमाण कमी झाल्याने व वाढत्या थंडीने व्हायरल तापाचे रुग्णही वाढले आहेत.
दिवाळीच्या तोंडावरच अचानक वातावरणात बदल झाला आहे. थंडीत वाढ झाली आहे. अशा वातावरणामुळे फटाक्यांचा धूर हा वर न जाता खालीच राहतो. परिणामी, गेल्या दोन दिवसात श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले, फटाक्यांच्या धुरातून सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड आणि फॉस्फरस वातावरणात पसरते. या शिवाय विविध घातक रसायनही हवेत मिसळतात. यामुळे प्रदूषणात वाढ होते.
-कोरोनावर मात करणाऱ्यांनी घ्यावी काळजी-डॉ. अरबट
डॉ. अशोक अरबट म्हणाले, कोरोना विषाणू थेट फुुफ्फुसावर हल्ला करतो. यामुळे कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी दिवाळीच्या दिवसात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना अद्यापही दम लागणे, खोकला येणे आदी समस्या आहेत. काहींना लंग फायब्रोसीस झाला आहे तर काही या मार्गावर जात आहे. यात फटाक्यांचा धुराचा मोठा त्रास या रुग्णांना होऊ शकतो. शहरात अद्यापही कोविडचे रुग्ण आहेत. यामुळे त्यांनाही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. सूज्ञ लोकांनी फटाके फोडू नये असे आवाहनही त्यांनी केले.
-फटाक्यांचा धुराचा त्रास अस्थामाच्या रुग्णांना-डॉ. स्वर्णकार
श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. राजेश स्वर्णकार यांनी सांगितले, फटाक्यांच्या धुराचा सर्वाधिक त्रास हा अस्थामाच्या रुग्णांसोबतच लहान मुले व वृद्धांना होतो. फटाक्याच्या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सुज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका, जीव घाबरणे, अॅलर्जीक खोकला, छातीत खरखर होणे आणि अस्थमा यासारख्या विकारांना सामोरा जावे लागत आहे.