नागपूर : हिंदू धर्माला धोका असल्याचा मुद्दा काल्पनिक व अवास्तविक आहे, असे उत्तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने माहितीच्या अधिकारांतर्गत दिले आहे, तसेच यासंदर्भातील सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी गेल्या ३१ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृह विभागाला अर्ज सादर करून यासंदर्भात माहिती मागितली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे या विभागाचे मंत्री आहेत. जन माहिती अधिकारी (अंतर्गत संरक्षण) व्ही. एस. राणा यांनी या अर्जावरील उत्तरामध्ये हिंदू धर्म धोक्यात असल्याची कोणतीच माहिती वा पुरावा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.
माहिती अधिकार कायद्यानुसार जन माहिती अधिकारी हे केवळ त्यांच्याकडे उपलब्ध असलेली किंवा त्यांच्या अधिकारांतर्गत येत असलेली माहितीच देऊ शकतात. सध्या केंद्र सरकारकडे हिंदू धर्म धोक्यात असल्याची काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे यासंदर्भात माहिती दिली जाऊ शकत नाही, असेही राणा यांनी नमूद केले आहे.
जबलपुरे यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना, केंद्रीय गृह विभागाने पहिल्यांदा हिंदू धर्म धोक्यात असल्याचा मुद्दा काल्पनिक असल्याचे आणि यासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे मान्य केले आहे, असे सांगितले. भाजपा नेते राजकीय लाभाकरिता हिंदू धर्म धोक्यात असल्याच्या अफवा पसरवितात व हिंदू नागरिकांच्या मनात भीती निर्माण करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेमध्येही हिंदू धर्म व भारतमातेचे संरक्षण करण्याचा उल्लेख आहे. ही प्रार्थना देशभरात म्हटली जाते. ही कृती राज्यघटनेच्या विरोधात आहे. त्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार आहे, असेदेखील जबलपुरे म्हणाले.