नागपूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विळखा आणखी घट्ट होत असून गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांच्या वर गेला. याशिवाय एका मृत्यूचीदेखील नोंद झाल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. जिल्ह्यात सक्रिय बाधितांची संख्या सात हजारांच्या वर गेली असून दररोज रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.
गुरुवारच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात २ हजार ८६ नवे कोरोनाबाधित आढळले. नागपूर शहरातच १ हजार ५८९ पॉझिटिव्हची नोंद झाली, तर ग्रामीण भागात ४३४ रुग्ण सापडले. ६३ रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते. गुरुवारी चाचण्यांची संख्यादेखील वाढली. जिल्ह्यात एकूण १३ हजार ६९३ चाचण्या झाल्या. त्यात शहरातील १० हजार ३२९ व ग्रामीणमधील ३ हजार ३६४ चाचण्यांचा समावेश आहे. २४ तासात ४७० रुग्ण बरे झाले व सक्रिय रुग्णसंख्या ७ हजार ३०३ वर पोहोचली आहे. ६ हजार ८७ रुग्ण शहरातील तर १ हजार १७० रुग्ण ग्रामीणमधील आहेत. शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख २ हजार ९०५ इतकी झाली असून बरे झालेल्यांचा आकडा ४ लाख ८५ हजार ४७७ इतका आहे.
मृत्युमुळे चिंता वाढीस
दरम्यान, शहरात परत एका मृत्यूची नोंद झाली. शहरातील एकूण मृत्युसंख्या ५ हजार ८९५ इतकी झाली असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींचा आकडा १० हजार १२५ इतका झाला आहे.
आरटीपीसीआर तपासणीवरच भर
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून आरटीपीसीआर तपासणीवरच भर देण्यात येत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ११ हजार ४५ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. तर ॲंटिजेन चाचण्यांची संख्या २ हजार ६४८ इतकी आहे.
४,७७८ होम आयसोलेशनमध्ये
एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४ हजार ७७८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यात शहरातील ३ हजार ३६९ रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील ४४२ रुग्ण विविध सरकारी, खासगी इस्पितळे तसेच कोविड केअर केंद्रांत दाखल आहेत. नागपूर शहरात अशा रुग्णांची संख्या १६९ इतकी आहे. २ हजार ८६ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवायचे की कुठे दाखल करायचे याबाबत प्रक्रिया सुरू आहे.