लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनीषनगरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण टाळेबंदीपूर्वीपासूनच रखडले आहे. मात्र, प्रशासनाकडून हे काम पूर्ण करण्याबाबत सुस्ती दाखवली जात आहे. या अर्धवट कामामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंटीकरण झाले आहे. त्यामुळे, दुसरी बाजू खाली गेली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीदरम्यान वाहने घसरत असल्याने अपघात होत आहेत. एवढेच नव्हे तर मनीषनगर डबलडेकर उड्डाणपुलाच्या उतारावरील सिमेंटीकरण अर्धवट असल्याने मार्ग बंद आहे. त्यामुळे येथे नियमित अपघाताची शक्यता असते. उड्डाणपुलावरून उतरताना वाहनांची गती जास्त असते आणि अचानक मार्ग बंद असल्याचे दिसल्याने चालक गोंधळून जातात. अर्धवट सिमेंटीकरणाने वाहनचालकांना रोजच समस्या भेडसावत आहे. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
वाहतूक कोंडी पुन्हा उद्भवली
मनीषनगरातील वाहतूक कोंडीची समस्या जुनी आहे. उड्डाणपुलाच्या निर्माणानंतर समस्या सुटेल, अशी आशा होती. मात्र, सिमेंटीकरणाचे काम अर्धवट असल्याने पुन्हा कोंडी निर्माण झाली आहे. एका बाजूने वाहतूक सुरू असल्याने ही कोंडी रोजचीच झाली आहे. काम वेळेत पूर्ण झाले असते तर ही समस्याच उरली नसती, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
टिन रस्त्यावर
रस्ता खोदून काम सोडून देण्यात आले आहे. जिथे सिमेंटीकरण सुरू आहे तो भाग टिनशेडने घेरण्यात आला आहे. मात्र, इथेही बेजबाबदारीचा कळस दिसून येतो. घेऱ्यातली टिन रस्त्याच्या दुसऱ्या भागावर आले आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. अनेक जण जखमीही झाले आहेत.
अंधारात अपघातांची भीती
रात्रीच्या वेळी या मार्गावर पूर्णत: अंधार असतो. मनीषनगर रोडवर केवळ स्ट्रीट लाईट असून, अपुरा उजेड असल्याने अनेक ठिकाणी अंधकार असतो. अशा स्थितीत वाहतुकीदरम्यान वाहनचालक दुसऱ्या भागावर घसरून पडतात. जिथे घसरून पडतात, तो भाग खोलगट असल्याने जीवाचा धोका असतो.
फुटपाथही अर्धवट
सिमेंटीकरणाचे बरेच काम झाल्यानंतर फुटपाथचे निर्माण व्हायचे होते. मात्र, कंत्राटदाराने फुटपाथचे काम अपुरे सोडले आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्यांना रस्त्याचा वापर करावा लागत आहे. अनेक जागी फुटपाथसाठी खोदकाम झाले आहे. यामुळे नागरिक संतापले आहेत.
गट्टू, सामग्री रस्त्यावर विखुरलेली
कामाप्रति बेजबाबदारी जागोजागी दिसून येत आहे. मनीषनगरात रस्त्यावर अनेक ठिकाणी निर्माण सामग्री रस्त्यावर विखुरली आहे. यामुळे वाहतुकीला समस्या निर्माण होत आहे. रस्त्यावर गट्टू, सामग्री पसरल्याने वाहन घसरण्याची स्थिती कायम आहे.