नागपूर : पश्चिम बंगालमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’मुळे आतापर्यंत १९ मुलांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या वाढत्या प्रकरणांमुळे तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुलांना मास्क घालण्याचे आवाहन केले. नागपुरातही शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’ दिसून येत असलातरी बाधित मुलांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, त्यांच्याकडून पालकांना होणारा संसर्ग अधिक दिवस राहत असल्याने चिंता वाढली आहे.
-काय आहे ॲडिनो व्हायरस?
‘ॲडिनो व्हायरस’ आपल्याकडे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारी, मार्चपर्यंत दिसून येतो. हा एक सामान्य ‘व्हायरस’ आहे. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षे बंद असलेल्या शाळा आणि घरातच मुले बंद असल्याने या ‘व्हायरस’ला पसरण्यास वाव मिळाला नाही. आता शाळा सुरू झाल्याने आणि त्यात मुलांची रोगप्रतिकारशक्तीही कमी झाल्याने यावर्षी ‘ॲडिनो व्हायरस’चे रुग्ण अधिक प्रमाणत दिसून येत आहे. तज्ज्ञानुसार, मुलांमध्ये हा व्हायरस लवकर बरा होत असलातरी त्यांच्याकडून पालकांमध्ये हा रोग पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस राहत असल्याचे दिसून येत आहे.
-लक्षणे काय?
सर्दी, ताप, घसा खवखवणे, खोकला, तीव्र ब्राँकायटिस (छातीत सर्दी), डोळे लाल होणे, अशक्तपणा आदी लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये अतिसार, उलट्या, मळमळ, पोटदुखी होते. गंभीर लक्षणांमध्ये निमोनिआ दिसून येतो.
-असा होतो प्रसार
बाधित रुग्णांच्या खोकल्यातून, शिकांतून या व्हायरसचा प्रसार होतो. या शिवाय, ॲडिनो व्हायरस असलेल्या वस्तू किंवा पृष्ठभागास स्पर्श केल्याने व तोच हात तोंडाला लावल्याने आजार पसरतो.
-सुरक्षित कसे राहायचे?
:: किमान २० सेकंद साबण आणि पाण्याने हात धुवा
:: न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा
:: आजारी असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळा
-प्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे
ंॲडिनो व्हायरसपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिकारशक्ती राखणे.
तुमची रोगप्रतिकारकशक्ती पुरेशी चांगली असल्यास, संसर्ग झाला असला तरीही तुम्ही लवकर बरे होऊ शकता.
-शाळेतून पसरणारा आजार
‘ॲडिनो व्हायरस’ हा सहसा शाळेतील विद्यार्थ्यांकडून घरातील व्यक्तींना होतो. आजार झाल्यास उपचार घेणे, विश्रांती व जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते. लक्षणे पाहून रुग्णांवर उपचार केले जातात. इन्फेक्शन अधिक वाढल्यास अँटिबायोटिक द्यावे लागते. हा आजार गंभीर नाही. मागील काही आठवड्यांच्या तुलनेत सध्या रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ