नागपूर : कार्यक्रमांच्या निमित्ताने आकाशाच्या दिशेने केल्या जाणाऱ्या तीव्र क्षमतेच्या प्रखर प्रकाशझोतामुळे नागपुरात विमान अपघात होऊ शकतो. होय, हा धोका अनेक वैमानिकांनी विमानतळ प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात ‘बिम लाइट’वर बंदी घातली आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसरात्र वेगवेगळ्या एअरलाइन्स तसेच भारतीय वायुसेनेची विमाने आणि हेलिकॉप्टर उतरतात तसेच उडतात. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि धावपट्टी दाखवण्यासाठी रन-वे तसेच एटीसी टॉवरकडून संकेतासाठी विशिष्ट लाइट्सचा वापर करण्यात येतो. दरम्यान, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने अनेक आयोजक आकाशाच्या दिशेने बिम लाइट (प्रखर प्रकाशझोत)चा वापर करतात. बिम लाइटमुळे अनेकदा वैमानिकांचे डोळे दीपून दुर्घटना होण्याची शक्यता असते. नागपूर विमानतळ परिसरात आणि आजूबाजूच्या भागात अनेक वैमानिकांना बिम लाइटचा नकारात्मक अनुभव आला आहे. त्यांनी तो स्थानिक विमानतळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आहे. विमानतळ प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांकडे हा प्रकार अलीकडे कथन करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांनी सोमवारी एक अधिसूचना जारी केली आहे. नागपूर विमानतळ आणि आजूबाजूच्या १५ किलोमीटर परिसरात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत प्रखर (बिम) लाइट आकाशाच्या दिशेने सोडू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कडक कारवाईचा इशारा
२० जानेवारीपासून पुढच्या दोन महिन्यांपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजक अथवा व्यक्तीने आदेशाचे उल्लंघन केल्यास भादंविच्या कलम १८८ अन्वये संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
-----