लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांमध्ये झालेली जागृती व महापालिकेच्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपुरातील तलावांच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. विसर्जनाबाबत केलेला धोरणात्मक बदल आणि यावर्षी जलसाठा अधिक असल्याने तलावात शुद्ध आॅक्सिजनचे प्रमाण समाधानकारक असून घातक टर्बिडीटी व आम्लाचे प्रमाण संतुलित आहे. मात्र ही स्थिती विसर्जनापूर्वीची आहे. उपायांची कठोर अंमलबजावणी राहिली नाही तर स्थिती पूर्वीप्रमाणे वाईट होण्याची शक्यता ग्रीन व्हिजील संस्थेने व्यक्त केली आहे.पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ग्रीन व्हिजील या संस्थेच्या सदस्यांनी नुकतेच शहरातील फुटाळा, सोनेगाव व गांधीसागर या तीन तलावातील पाण्याचे परीक्षण केले. अर्थ इको इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने ग्रीन व्हिजीलतर्फे गेल्या सहा वर्षापासून हे परीक्षण केले जात आहे. यावेळी झालेल्या परीक्षणाबाबत माहिती देताना ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल यांनी सांगितले की, पाण्याच्या गुणवत्तेसाठी आवश्यक डिझॉल्व आॅक्सिजनचे प्रमाण, गढूळपणा (टर्बिडीटी) व आम्लाची स्थिती (पीएच लेव्हल) संतुलित प्रमाणात आढळून आले आहे. पाण्याच्या गुणवत्तेसाठी डिझॉल्व आॅक्सिजनचे प्रमाण ५ मिलिग्रॅम/लिटर किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. २०१६ व २०१७ मध्ये विसर्जनापूर्वीच हे प्रमाण फुटाळा तलावात ३.५ मिलिग्रॅम/लिटर, गांधीसागर तलावात ४.५ ते ५ मिलिग्रॅम/लिटरच्या आसपास होते.यावर्षी मात्र हे प्रमाण फुटाळा तलावात ४.५ व गांधीसागर तलावात ५ मिलिग्रॅम/लिटर म्हणजे समाधानकारक म्हणावे असे आहे. याशिवाय गढूळपणाची स्थिती ५० जेटीयू किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. फुटाळा तलावात २०१६ मध्ये गढूळपणा ६० जेटीयू, २०१७ मध्ये ७० जेटीयू होती, जी यावर्षी ६० जेटीयूपेक्षा कमी आहे. गांधीसागर तलाव मागील दोन वर्षी अधिक प्रदूषित होते. दोन्ही वर्षी ७५ जेटीयू एवढी होती, जी यावर्षी ७० पेक्षा खाली आली आहे. याबाबतीत सोनेगाव तलाव नशीबवान ठरला. दोन वर्षापूर्वी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती चालविलेल्या उपाययोजनांमुळे डिझॉल्व आॅक्सिजन, गढूळपणा व आम्ल स्तराचे प्रमाण संतुलित राहिले आहे. फुटाळा व गांधीसागरमध्ये दोन वर्षात ८.५ पर्यंत गेलेले आम्ल स्तराचे प्रमाण यावेळी ८.२ वर आले आहे. गुणवत्तेसाठी पाण्यात पीएच स्तर ७ वर असणे आदर्श मानले जाते.या परीक्षणात मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य यांच्यासह संस्थेचे अन्य सदस्य व सेवादल महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
जलपर्णी वनस्पतीचा बंदोबस्त गरजेचासोनेगाव तलावाची स्थिती चांगली असली तरी विसर्जनानंतर कृत्रिम तलावाचा गाळ पुन्हा सोनेगाव तलावात सोडला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिस्थिती जैसे थे होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सुरभी जैस्वाल यांनी सांगितले. यातील गांधीसागर तलावाची स्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे या तलावात विसर्जनाला पूर्णपणे प्रतिबंध लावणे आवश्यक असल्याचे मत सुरभी यांनी व्यक्त केले. तसेच फुटाळा तलावातील जलपर्णी वनस्पतीचा बंदोबस्त करणे आणि विसर्जनावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे तलाव व वस्त्यांच्या आसपास अधिक कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यासोबत लोकांमध्ये जागृती आणणे महत्त्वाचे असल्याचे सुरभी जैस्वाल यांनी स्पष्ट केले.