दत्ता भगत : १३व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नागपूर : सत्तांतरानंतर देशात खूप कठीण काळ आला आहे. नव्या पिढीला पुरोगामित्वाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांना ठरवून लक्ष्य केले जात आहे. नागपुरात आज होणारे सीताराम येचुरी यांचे भाषण रद्द होणे, हे त्याचेच उदाहरण आहे, असा थेट आरोप ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. दत्ता भगत यांनी केला. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती दर्शन महामंडळाच्या निळाई परिवारातर्फे बैद्यनाथ चौकातील अजंता सभागृहात आयोजित १३व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी कॉ. भारत पाटणकर, उद्घाटिका डॉ. गेल आॅम्व्हेट, स्वागताध्यक्ष विजय तागडे, प्रवीण कांबळे, अशोक बुरबुरे उपस्थित होते. प्रा. दत्ता भगत पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ केवळ बौद्धांच्या हितासाठी नाही तर ती समाजाला एका सूत्रात बांधण्यासाठी गरजेची असेलेली जातीअंताची लढाई आहे. तिचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. ही गोष्ट दलितेतर लोकांना पटवून देण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कॉ. भारत पाटणकर म्हणाले, बाबासाहेबांची जयंती केवळ आपल्या वस्तीतच साजरी करू नका, त्या जयंतीचे आयोजन गावातील मुख्य चौकात करा. बाबासाहेब हे केवळ त्या वस्तीचेच नाहीत आपलेही आहेत हा विश्वास समाजील सर्व स्तरात निर्माण झाला पाहिजे. साहित्य हे त्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. आज येथे आयोजित साहित्य संमेलनात विज्ञानावर परिसंवाद होतोय, ही फार आनंदाची गोष्ट आहे. बुद्धाचा विचारच मुळात विज्ञानवादी होता. त्याचा प्रसार झाला पाहिजे. साहित्याच्या माध्यमातूनच आता जातीअंताची लढाई पुनरुज्जीवित व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. गेल आॅम्व्हेट यांनी उद्घाटनीय भाषण केले. प्रवीण कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली, अशोक बुरबुरे यांनी प्रास्ताविक केले. संचालन शालिक जिल्हेकर तर आभार प्रभू फुलझेले यांनी मानले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘आंबेकडरी साहित्यातील माझी भूमिका आणि वास्तव’, ‘बदलते सामाजिक वास्तव आणि आंबेकडरी साहित्य’ या दोेन विषयावर परिसंवाद आणि संध्याकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले.(प्रतिनिधी)
देशभरातील पुरोगामी प्राध्यापकांचे स्वातंत्र्य धोक्यात
By admin | Published: March 19, 2017 3:07 AM