रायपूरची पुनरावृत्ती नागपूरला होऊ नये : रुळापासून १५ फुटांवरच दुचाकीची पार्किंगदयानंद पाईकराव नागपूर रायपूर रेल्वेस्थानकावर रविवारी अचानक शेकडो दुचाकींनी पेट घेतल्यामुळे आगीचे लोळ उठले. काही कालावधीतच शेकडो गाड्या आगीत भस्मसात झाल्या. सुदैवाने ही आग पार्किंग परिसरात लागल्याने मोठी हानी टळली. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर यापेक्षा विपरीत स्थिती असून, थेट रेल्वे रुळापासून १५ फूट अंतरावरच दुचाकीची पार्किंग करण्यात येत असून, रायपूरसारखी घटना येथे घडल्यास अख्खे रेल्वेस्थानक भस्मसात होण्याची दाट शक्यता आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १२५ ते १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. यात प्रवाशांची संख्याही ४० ते ४५ हजारावर जाते. नागपूर रेल्वेस्थानक देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काहीच खबरदारी घेण्यात येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर आठ प्लॅटफॉर्म आहेत. रायपूरला दुचाकीच्या पार्किंगमध्ये आग लागल्यानंतर ‘लोकमत’ने नागपूर रेल्वेस्थानकावरील सुरक्षेचा आढावा घेतला असता ही गंभीर बाब निदर्शनास आली. रेल्वे रुळापासून १५ फूट अंतरावरच दुचाकीची पार्किंग करण्यात येत असून, एखाद्या प्रसंगी एखाद्या दुचाकीला आग लागल्यास सर्वच दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अग्नितांडव होऊ शकते. रेल्वेस्थानकावर अचानक आग लागल्यास सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे रायपूरला घडलेल्या घटनेपासून रेल्वेच्या अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेने धडा घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी झोपेतरेल्वेस्थानकावरील सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी नागपुरात स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी कार्यरत आहे. यात आयओडब्ल्यू, स्टेशन मॅनेजर, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, मेकॅनिकल सुपरवायझर, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी या समितीची नियमित बैठक होऊन त्यात रेल्वेस्थानकावरील सोयीसुविधांचा तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्यासाठी जबाबदारी सोपवून दररोज सर्व रेल्वेस्थानकाची पाहणी होत होती. परंतु कामचुकारपणामुळे ही प्रथा आपल्याच सोयीसाठी या कमिटीने बंद पाडल्याची स्थिती आहे. सध्या कोणी तक्रार केली तरच ही कमिटी त्या तक्रारीची दखल घेते. रुळाशेजारी दुचाकी उभ्या राहणे ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब असूनही कमिटीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गाढ झोपेत असलेल्या ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ला विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी सक्त ताकीद देण्याची गरज आहे.ज्वलनशील पदार्थांच्या मालगाड्या धोकादायकरेल्वेस्थानकावर पेट्रोल, डिझेल, केरोसिन, डांबर, कोळसा आणि ज्वलनशील पदार्थ असलेले मोठे बंब असलेल्या मालगाड्या अनेकदा सिग्नल न मिळाल्यामुळे लुपलाईनवर रेल्वेस्थानक परिसरात उभ्या असतात. अशा स्थितीत आगीची घटना घडल्यास मोठी वित्त आणि जीवितहानी होऊ शकते.रुळाशेजारी पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई‘रेल्वे रुळाशेजारी दुचाकी उभ्या करणे ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने वेळोवेळी याचा पाठपुरावा करण्यात येतो. परंतु तरीसुद्धा रेल्वे कर्मचारी पार्किंग करीत असतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.’- ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, नागपूर
- तर रेल्वेस्थानकाला धोका
By admin | Published: April 11, 2017 2:14 AM