लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जंगलामधील तेंदूपत्ता तोडाईचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी आणि आदिवासींना जोखमीशी सामना करावा लागत आहे. मागील १५ दिवसात विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात ६ व्यक्तींचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यातील चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा मृत्यू एकाच दिवशी झाल्याने हा विषय अधिक संवेदनशील ठरला आहे. तर मागील वर्षीच्या तेंदूपत्ता हंगामात ७ व्यक्तींचा मृत्यू विदर्भात झाल्याची नोंद आहे.
यंदा तेंदूपत्ता हंगामात वन्यजीवांच्या हल्ल्यात ६ व्यक्ती ठार झाले. यातील तीन घटना गडचिरोली जिल्ह्यातील असून तीन घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. आरमोरी तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रात १८ मे रोजी एक महिला वाघाच्या हल्लात ठार झाली. याच आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात १९ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यात तीन घटनांची नोंद आहे. भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा, चिमूर तालुक्यातील पेंढरी-कोकेवाडातील एक महिला आणि सावली तालुक्यातील निफंद्रा गावातील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे.
२०२० च्या तेंदूपत्ता हंगामातही ७ मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. यात गडचिरोली ३, गोंदिया २ आणि भंडारा व नागपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक घटना घडल्याची माहिती आहे. यातील मृतांच्या वारसांना मिळणारी नुकसानभरपाई कोरोना संक्रमणामुळे रखडल्याची माहिती आहे.
वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष
या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आहेत. तेंदूपत्ता तोडाईला मिळून जा, सकाळी लवकर जाऊ नका अशा सूचना आहेत. मात्र अधिक तेंदूपत्ता मिळावा यासाठी कुटुंबातील मोजके सदस्य मिळून जातात. तेंदूपाने तोडताना बराच वेळ वाकून राहू नये. एकमेकांशी सारखे बोलत राहावे, वनात डोक्यामागे मुखवटा घालून चालावे, खांद्यावर जमिनीस समांतर काठी घेऊन चालावे, असे उपायही यापूर्वी सुचविण्यात आले आहेत.
तेंदूपत्ता हंगामातील मृत्यूच्या घटना
जिल्हे - वर्ष २०२० - वर्ष २०२१
गडचिरोली : ३ मृत्यू - ३ मृत्यू
गोंदिया : २ मृत्यू, ३ जखमी - निरंक
भंडारा : १ मृत्यू - निरंक
नागपूर : १ मृत्यू - निरंक
चंद्रपूर : ... - ३ मृत्यू
घटनांमध्ये दरवर्षी वाढ
एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २०१० ते मे २०२१ पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २५८ जणांचा मृत्यू झाला. मार्च ते १८ मे २०२१ पर्यंत महिन्यात ९ जणांचा बळी गेला. २०१६ पासून वन्यप्राण्यांकडून हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी ताडोबा व्याघ प्रकल्प क्षेत्रालगतची गावे आणि ब्रह्मपुरी उपवन क्षेत्रात घटना घडायच्या. आता राजुरा, गोंडपिपरी, चिमूर, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही परिसरातही घटना वाढल्या आहेत. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या मर्यादित होती. दोन वर्षात आरमोरी, वडसा-देसाईगंज, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यातही वाघांचा वावर वाढल्याने तेंदूपत्ता हंगामातील वाघ आणि अन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.