लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फिल्टर प्लांटच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी चार ४.३० ते ५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली.जगत विनोद निंबार्ते (वय १४ वर्षे) असे मृत मुलाचे नाव असून तो भांडेवाडी रेल्वे स्टेशनजवळच्या गिरिजा नगरात राहत होता. तो नववीचा विद्यार्थी होता. जगत त्याच्या काही मित्रांसोबत आज सायंकाळी फिल्टर प्लांट जवळच्या मैदानात क्रिकेट खेळायला गेला होता. खेळता खेळता एकाने बॉल फटकावल्याने बॉल फिल्टर प्लांट कंपाऊंडच्या आत गेला. त्यामुळे भिंतीवरून उडी मारून जगत बॉल आणायला आत गेला. बॉल घेऊन परत भिंतीवरून येत असताना अनवधानाने त्याचा हात वॉल कंपाऊंडवरून गेलेल्या विजेच्या जिवंत तारांना लागला. त्यामुळे त्याला जोरदार करंट लागून तो खाली पडला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून वस्तीतील नागरिकांना ही माहिती दिली. त्यानंतर मोठ्या संख्येत नागरिक तेथे जमा झाले. माहिती मिळताच जगतचे वडील विनोद निंबार्ते तेथे पोहचले. जगत निपचित पडून असल्याचे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला आणि त्याला हलवून उठवण्याचे प्रयत्न केले. माहिती मिळताच वाठोड्याचे सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. मेटे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी जगतला मेडिकलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावीजगतचे वडील विनोद निंबार्ते वेल्डिंगचे काम करतात. आई नंदा गृहिणी असून त्याला दुष्यंत नामक मोठा भाऊ आहे. या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. जगतच्या अशा अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. या कुटुंबाला वीज मंडळाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
क्रिकेट खेळताना घात : नागपुरात करंट लागून १४ वर्षांच्या मुलाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:07 AM
फिल्टर प्लांटच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी चार ४.३० ते ५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली.
ठळक मुद्देवाठोडा परिसरात हळहळ