लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर ( मौदा ): मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कंपनी (एनटीपीसी) प्रकल्प क्षेत्रातील स्क्रॅप यार्ड परिसरातील जंगलाला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. आगीमुळे प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती आहे.हा अत्यंत संवेदनशील प्रकल्प असल्याने तातडीच्या उपाययोजना म्हणून नागपूर, कामठी आणि अल्ट्राटेक कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिंळविण्यात आले. एनटीपीसी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याने येथे सीआयएसएफची सुरक्षा व्यवस्था आहे. सध्या विदर्भात पारा उच्चांक गाठत आहे. त्यामुळे वाळलेल्या गवताने पेट घेऊन परिसरात आग पसरल्याचा अंदाज कंपनीचे जनसंपर्क अधिकारी समीर लाल यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रकल्पाचे महाव्यवस्थापक जॉन फिलिप्स यांनी मौद्याचे तहसीलदार प्रशांत सिंगाडे यांना आगीची माहिती दिली. आगीची भीषणता अधिक असल्याने प्रशासनाकडून त्यांनी मदतीची मागणी केली. तहसीलदार सिंगाडे यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी संपर्क साधून एनटीपीसी प्रकल्प क्षेत्रात अग्निशमन दलाच्या गाड्या पाठविल्या.एनटीपीसीच्या मागील बाजूस भेल कंपनीची साहित्य व स्टोअर रुम आहे. येथे त्यांचे जुने व नवीन साहित्य आहे. लगतच झाडे व झुडपे आहेत. आग कशी लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.मात्र मौद्यात नागपूर, कामठी आदी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या गाड्या आल्याने तालुक्यात आगीची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. याप्रकरणी एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगत दिवसभर या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशा चर्चांनाही पेव फुटले होते. मात्र या आगीत किती क्षेत्रात आग लागली आणि नुकसानाचे स्वरूप काय, हे कंपनीकडून स्पष्ट होऊ शकले नाही.
नागपूरनजीकच्या मौदा येथील एनटीपीसी प्रकल्प क्षेत्रात भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 9:53 PM
मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कंपनी (एनटीपीसी) प्रकल्प क्षेत्रातील स्क्रॅप यार्ड परिसरातील जंगलाला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. आगीमुळे प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला : वनसंपदा नष्ट