लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (गुमथळा) : निरुपयोगी प्लास्टिकपासून त्याचे दाणे तयार करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली. त्यात कंपनीच्या आवारातील कच्चा माल, आतील मशिनरी व पक्का माल जळून राख झाला. यात अंदाजे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीच्यावेळी कंपनीमध्ये कुणीही नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना नागपूर - मौदा - भंडारा महामार्गावरील महालगाव शिवारात असलेल्या श्रीराम प्लास्टिक कंपनीमध्ये मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. दुपारी २ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.महालगाव (ता. कामठी) शिवारातील महामार्गालगत अनिल हेमराज गणात्रा, रा. नागपूर यांची दागोबा इंडस्ट्रीज नामक कंपनी आहे. या कंपनीशेजारील जागा रिकामी असल्याने ती अनिल गणात्रा यांनी पारवानी, रा. नागपूर यांना किरायाने दिली असून, त्या जागेवर पारवानी यांची श्रीराम प्लास्टिक नामक कंपनी आहे. या कंपनीमध्ये निरुपयोगी प्लास्टिकच्या वस्तू व पिशव्यांपासून प्लास्टिकचे दाणे तयार केले जातात. त्या दाण्यांची दुसऱ्या कंपनीला विक्री केली जात असून, त्यापासून पुन्हा प्लास्टिकच्या वस्तू तयार केल्या जातात.दरम्यान, सकाळी ७ वाजताच्या सुमारास कंपनीच्या आतील भागात ठेवलेल्या साहित्याने पेट घेतला. त्यावेळी कंपनीत कुणीही नसल्याने आग पसरत केली. आतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच सुरक्षा रक्षकांनी पारवानी यांच्यासह नागपूर महानगर पालिका आणि कामठी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तसेच मौदा पोलीस ठाण्याला सूचना दिली. माहिती मिळताच दोन्ही ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या एकूण १२ गाड्या टप्प्याटप्प्याने घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारी २ वाजताच्या सुमारास या आगीवर काहिसे नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. तोपर्यंत आतील मशिनरी, कच्चा व पक्का माल तसेच कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पूर्णपणे जळाला. या आगीत अंदाजे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीचे मालक पारवानी यांनी दिली असून, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाजही व्यक्त केला.जीवितहानी टळलीया कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या फार मोठी नाही. कंपनीमध्ये सकाळी १० वाजतापासून कामाला सुरुवात होत असल्याने कामगार सकाळी ९ वाजतानंतर कामावर यायला सुरुवात होते. सकाळी ७ वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त कुणीही नव्हते. त्यामुळे आगीत कुणालाही दुखापत झाली नाही. शिवाय, आग इतरत्र न पसरल्याने इतरांचे नुकसान झाले नाही.वाहतूक विस्कळीतही कंपनी नागपूर - भंडारा महामार्गालगत आहे. या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. कंपनीतून धुराचे लोट निघत असल्याचे लक्षात येताच चालकांनी त्यांची वाहने मध्येच थांबविली होती. त्यातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेळीच वाहतूक सुरळीत करून मार्ग मोकळा केला.