जितेंद्र ढवळे
नागपूर : कोंढाळी-नागपूर महामार्गावर चाकडोह फाट्याजवळ शिवा रोडकडे दुचाकी वळविताच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने बुधवारी दुचाकीवरील तिघांचा बळी गेला. नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या अशा पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे या धोकादायक जंक्शनवरील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी केल्या जातील, हे अद्यापही अंधातरीच आहे.
नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला (क्रमांक ५३) बाजारगाव येथे बाजारगाव-डोरली राज्य मार्ग क्रमांक ३३६ बाजारगाव-लिंंगा-लाडई-कळमेश्वर राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-चिचोली-दाभा-येरणगाव राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-शिवा-अडेगाव प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १२ व बाजारगाव पोचमार्ग (ग्रामीण मार्ग क्रमांक १४) हे मार्ग जोडले आहेत. याशिवाय चाकडोह फाटा हे रस्ते बाजारगाव येथे नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला जोडले आहेत.
या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. याशिवाय अवजड वाहनांच्या अतिवेगामुळे या मार्गावर छोट्या वाहनधारकांना प्रवास करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. त्यामुळे बाजारगाव येथून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग नेहमीच अपघाताचे केंद्र ठरतो आहे.
असे झाले अपघात
२०२० मध्ये या मार्गावर ४१ अपघात झाले. यात २३ लोकांचा जीव गेला. २०२१ मध्ये ५८ अपघातांत २८ लोकांचा जीव गेला, तर ३७ जण गंभीर जखमी झाले. २०२२ मध्ये ६६ अपघातांत २९ लोकांचा मृत्यू झाला, तर ३४ गंभीर जखमी झाले. २०२३ मध्ये आतापर्यंत १६ अपघातांत ९ लोकांचा जीव गेला, तर ७ गंभीर जखमी झाले.
काम कधी सुरू होणार?
नागपूर-कोंढाळी मार्गावरील या धोकादायक जंक्शनवर अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना एप्रिल २०२२ ला दिले होते. यावर गडकरी यांनी ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ‘एनएचआय’ने या अपघातप्रवणस्थळांचे सर्वेक्षण केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याबाबत विस्तृत आराखडाही तयार केला होता. यानंतर ‘एनएचआय’ने या कामाच्या निविदाही काढल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पंजाब येथील भिंदरा ब्रदर्स इंडिया कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे; मात्र ही कंपनी या अपघातप्रवण स्थळांवर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे काम कधी सुरू करणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
कामगारांची २४ तास वर्दळ
या मार्गावर सोलार, इकोनॉमिक्स, पार्कर, डिफेन्स प्रकल्प, सारडा इंडस्ट्रीज आदी मोठ्या कंपन्या आहेत. येथे ७० हून अधिक गावांतील कामागार शिफ्टनुसार कामावर येतात. याशिवाय फनफूड, बाजारगाव हनुमान मंदिर, जैन मंदिर आदी धार्मिक स्थळे असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते; मात्र वाहतूक नियोजनाच्या कोणत्याही उपायोजना नसल्याने या मार्गावर अनेकांचे जीव गेले आहेत.