लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगले बनविण्याची योजना जाहीर करून, अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.त्याच्या वकिलांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर १५ जुलैला न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, फरार डांगरेचा पोलीस जागोजागी शोध घेत आहेत.डांगरेविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात एक आठवड्यापूर्वी गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून तो फरार आहे. त्याला शोधण्यासाठी पोलीस इकडे तिकडे धावपळ करीत आहेत. मात्र डांगरे हाती लागत नसल्यामुळे डांगरेचे ‘पोलीस मित्र’च त्याला वाचवत असावे, असा संशय घेतला जात आहे. दरम्यान, डांगरेच्या जुन्या गुन्ह्याची जंत्री बाहेर काढण्याचे आदेश वरिष्ठांकडून हुडकेश्वर पोलिसांना मिळाले आहे. तिकडे डांगरे पोलिसांच्या सहकार्यामुळेच आतापर्यंत बिनबोभाट नागरिकांची फसवणूक करीत होता आणि त्यांना धमक्या देत होता, असा आरोप पीडित मंडळीकडून केला जात आहे. डांगरेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून त्याला अटकपूर्व जामीन मिळू नये, यासाठी कसोशीचे प्रयत्न केले जात असल्याचे हुडकेश्वरचे ठाणेदार राजकमल वाघमारे यांनी म्हटले आहे.
डांगरेच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:30 PM