लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचे नेते खा. रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससच्या अनेक नेत्यांनी दानवे यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांचे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रपरिषद आयोजित केली होती. यादरम्यान त्यांना पत्रकारांनी दानवेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर मागील १२ दिवसांपासून शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. देशातील बहुतांश पक्षांनी संघटनांनी त्यांना आपला पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आंदोलनाबाबत असे वक्तव्य योग्य नाही. दानवे हे केंद्रीय मंत्री राहिले आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना याबाबत काही माहिती असेल तर त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा येत्या १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. यंदा कोरोनाचा संसर्ग असल्याने त्यांचा वाढदिवस पक्षातर्फे वेबीनारच्या माध्यमातून केला जाईल. नागपुरात मी स्वत: (अनिल देशमुख) नाशिकमध्ये छगन भुजबळ, बीडमध्ये धनंजय मुंडे आदी प्रत्येक ठिकाणी प्रमुख नेते वेबीनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. तसेच १२ तारखेला संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राज्याला रक्ताची नितांत गरज असल्याने हे शिबिर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शक्ती कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले, महिला अत्याचार रोखण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा शक्ती कायदा राज्य सरकार आणत आहे. याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याला सर्वच पक्ष व सदस्यांची मंजुरी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हा कायदा देशपातळीवर अमलात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.