लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील बहुतांश गावात महावितरण कंपनीने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गावातील पथदिव्याखाली अंधार आहे. रात्रीच्या सुमारास सर्वत्र अंधार पसरत असल्याने गावकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागताे. त्यामुळे पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी करीत विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचासह गावकऱ्यांनी तहसील कार्यालयावर कंदील माेर्चा काढून समस्येकडे लक्ष वेधले.
अनेक ग्रामपंचायतींनी विद्युत बिलाचा भरणा केला नाही. यापूर्वी पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या बिलाचा जिल्हा परिषदेकडून भरणा केला जात हाेता. मात्र गेल्या वर्षीपासून ही दाेन्ही विद्युत बिल ग्रामपंचायतला भरावयाचे आहे. काेराेना महामारीमुळे ग्रामपंचायतींची कर वसुली झाली नाही. परिणामी, ग्रामपंचायतींचे विजेचे बिल थकीत राहिले. तालुक्यातील १५५ गावात ग्रामपंचायतअंतर्गत पाणीपुरवठा याेजना असून, यापैकी ८९ ग्रामपंचायतींनी एप्रिल ते जुलै २०२१ पर्यंत ९ लाख ८४ हजार २१९ रुपयांचा भरणा केला. अजूनही थकबाकी शिल्लक आहे. ग्रामपंचायतींनी गेल्या काही वर्षांपासून पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा केलेला नसल्याने ग्रामपंचायतींवर थकीत देयकांचा डाेंगर वाढला आहे. १४२ गावातील पथदिव्यांचा दिव्याखाली अंधार आजही कायम आहे.
सध्या पावसाचे दिवस असून, तालुक्यातील गावे जंगलव्याप्त भागात वसली आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या सुमारास गावात सर्वत्र अंधार असताे. त्यामुळे हिंस्र वन्यप्राणी गावात शिरून धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने खंडित केलेला पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते प्रमाेद घरडे व माजी जि.प. सदस्य बालू ठवकर यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमाेर आंदाेलन केले. यावेळी तहसीलदार बाबाराव तिनघसे यांच्याकडे निवेदन साेपविण्यात आले. या आंदाेलनात साळवा येथील सरपंच नीतेश मेश्राम, उपसरपंच पुष्पा राघाेर्ते, ईश्वर भारती, सरपंच जितू ठवकर, चंदू वैद्य, राजेश गायधने, बल्लू पाटील, दीपक भाेंबे, रूपाली घरडे, मुक्ता भाेंबे, माेनू मोंढे, कुंदा केळझरकर, रंजना सहारे, शशी ठाकरे, कमलाकर जरवेकर, रामा झलके, विलास वहिलकर, भगवान कानताेडे, लाला कुंभरे आदींसह नागरिकांचा सहभाग हाेता.
....
वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका
गावातील पथदिव्यांचे विद्युत कनेक्शन कापल्याने गावात सर्वत्र अंधार असताे. पावसाळ्याच्या दिवसात गावातील रस्ते चिखलाने माखलेले आहेत. शिवाय सर्वत्र घाणीचे साम्राज्य व झुडपे वाढल्याने गावात हिंस्र वन्यप्राणी तसेच साप, विंचू या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असताे. रात्रीच्या अंधारात हिंस्र श्वापदे अथवा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धाेका उद्भवू शकताे. त्यामुळे महावितरणने गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.