नागपूर : महावितरणकडून पुन्हा गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई करताना कुठलीही नोटीस ग्रामपंचायतीला न देता थेट कारवाई करण्यात येत असल्याने सरपंचांनी रोष व्यक्त केला आहे.
गेल्या ८ ते १० दिवसापासून जिल्ह्यातील गावागावांमध्ये पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येत आहे. सावरगाव जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत येणाऱ्या जुनोना (फुके) या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावामध्ये पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला. ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल फुके यांचे म्हणणे आहे की, यासंदर्भात कुठलीही नोटीस महावितरणने ग्रामपंचायतीला दिली नाही. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणच्या कार्यालयात विचारणा केली असता, थकीत वीज बिल भरण्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सुरू आहे.
- वीज बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही
ऊर्जा विभागाने १६ मे २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे की, २०१८ पूर्वी लागलेल्या पथदिव्यांच्या वीज देयकाची वसुली ग्रामविकास विभागाने शासन अनुदानातून अथवा वित्त आयोगाच्या अनुदानातून भरणा करावी. गावांमध्ये लागलेले सर्व पथदिवे हे २०१८ च्या पूर्वीचेच आहेत. ऊर्जा विभागाचा शासन निर्णय असताना महावितरण त्याकडे दुर्लक्ष करून पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करून ग्रामपंचायतीकडून वीज बिल वसूल करीत असल्याचा आरोप सरपंच संघटनेचे मनीष फुके यांनी केला आहे.