निवडणुकीची तयारी : साडेचार वर्षांतील विकासाचा लेखाजोखा मांडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक जवळ आल्याने मागील साडेचार वर्षांत प्रभागातील लोकांना दर्शन न झालेले नगरसेवक विकास पुस्तिका काढणार आहेत. महापालिकेतील सत्तापक्षाने प्रभागात कोणती विकास कामे केली, याचा लेखाजोखा यातून मांडला जाणार आहे.
प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक आहेत. परंतु यातील काही मोजके नगरसेवक वगळता इतरांचा चेहरा अजूनही लोकांनी बघितलेला नाही. प्रत्येक प्रभागातील एक किंवा दोन नगरसेवक सक्रिय आहेत. इतरांना आपल्या प्रभागात कोणत्या वस्त्यांचा समावेश आहेत, समस्या कुठल्या आहेत, याची अजूनही जाणीव नाही. परंतु निवडणूक आल्याने मनपातील सत्ताधारी भाजप नेते सक्रिय झाले आहेत. सत्तापक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकी सुरू आहेत. यात प्रत्येक प्रभागाची स्वतंत्र विकास पुस्तिका काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १० ते १२ हजार पुस्तिका छापून घराघरात विकास पोहोचविला जाणार आहे. सोबतच प्रभागात जंगी प्रकाशन समारंभ आयोजित करून वातावरणनिर्मिती केली जाणार आहे. याचे नियोजन सुरू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
....
विकासच नाही तर पुस्तिका कशाची?
२०१७ च्या निवडणुकीत भाजपला विक्रमी बहुमत मिळाले होते. मनपातील १५१ नगरसेवकांपैकी तब्बल १०८ नगरसेवक सत्तापक्षाचे आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेले काही मोठे प्रकल्प वगळता दोन वर्षात विकास ठप्प आहे. प्रभागातील कामे रखडलेली आहेत. अंतर्गत रस्ते, गटारलाईन, नाल्या, उद्यानांची दुर्दशा, शहरालगतच्या भागातील पाण्याची समस्या, शाळा, रुग्णालयांची दुरवस्था, अशा साडेचार वर्षांपूर्वीच्या समस्या अजूनही कायम आहेत. विकासच नाही तर पुस्तिका कशावर काढणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
....
अंतर्गत गटबाजी वाढली
सत्तापक्षातील वजनदार नगरसेवकांनी निधी कधी पळविला, याचा इतरांना थांगपत्ता लागला नाही. गटातटाचे राजकारण व गटबाजीमुळे फाईल मंजूर होत नसल्याने सत्तापक्षातील काही नगरसेवकांची फाईल मंजुरीसाठी भटकंती सुरू आहे.