लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हनुमान जयंतीला भाविकांनी कायदा जपत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत भगवंताचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रशासनानेही कोरोनाच्या पार्र्श्वभूमीवर देवालये बंदच ठेवली. सकाळच्या सुमारास पूजन आणि आरतीनंतर मंदिरांची द्वारे बंद ठेवली आणि नागरिकांना द्वारावरूनच दर्शन घेण्याचे आवाहन केले.बुधवारी सबंध देशभरात हनुमान जयंती साजरी झाली. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने आणि शहरात कलम १४४ असल्याने सर्व मंदिर प्रशासनांनीही तशी काळजी आधीपासूनच घेतली आहे. एरवी हनुमान जयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. राजाबाक्षा येथून रथयात्राही काढली जाते. मात्र, यंदा संसर्गाच्या धास्तीने कायदा पाळत ही रथयात्राही स्थगित करण्यात आली. राजाबाक्षा हनुमान मंदिर, रमणा मारोती हनुमान मंदिर, तेलंगखेडी हनुमान मंदिर येथे भक्तांची गर्दी उसळत असते. मात्र, भाविकांनीही काळाची स्थिती बघता स्वत:च सोशल डिस्टन्सिंग जपत आपले भक्तकर्तव्य पार पाडले. अनेकांनी घरूनच हा जयंती उत्सव साजरा केला. रमणा मारोती मंदिरात सकाळची पूजाअर्चा उरकल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. दिवसभर मात्र अनेक भक्तांनी अनवाणी चालत मंदिरापर्यंत येऊन बाहेरूनच दर्शन घेतले. श्रीकृष्णनगर चौक येथे दरवर्षी हनुमान जयंतीचा विशेष सोहळा साजरा केला जातो. मात्र, मंदिर प्रशासनाने आधीच पूर्वसूचना देऊन भाविकांनी यंदा कायदा पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. अशाच प्रकारे चिटणवीस नगर येथील हनुमान मंदिर, वाठोडा येथील हनुमान मंदिर, गोपाळकृष्णनगर येथील हनुमान मंदिराचे चित्र होते. एकूणच यंदा गर्दी उसळली नसली तरी हनुमान जयंती उत्सव सजगतेने साजरा झाला, हे विशेष.
‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत हनुमान मंदिरात बाहेरूनच घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 7:08 PM