नागपूर : वृत्तपत्रे व इतर सर्वच माध्यमांमध्ये वेगाने बदल होत असून काही सेकंदांमध्ये बातम्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. परंतु फक्त माहिती पोहोचविण्यापुरती पत्रकारिता करून चालणार नाही. क्रांतिकारी पत्रकारितेचा वारसा जोपासायला हवा. आगामी काळात आरोग्याचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा विषय असेल शिवाय डेटावर आधारित पत्रकारिता ही काळाची गरज आहे तसेच ओटीटी, व्हिडीओ ऑन डिमांड व आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचे तंत्रदेखील अभ्यासावे लागेल, असे प्रतिपादन राजस्थान विद्यापीठाच्या जनसंवाद केंद्राचे माजी प्रमुख प्रा. डॉ. संजीव भानावत यांनी केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त "पत्रकारितेतील नवे आयाम" या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठातील पत्रकारिता विभागांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही. पवार व वरिष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे, डॉ. मोईज मन्नान हक (नागपूर), डॉ. सुधीर भटकर (जळगाव), डॉ. रवींद्र चिंचोलकर (सोलापूर), डॉ. नीशा पवार (कोल्हापूर), डॉ. उज्वला बर्वे (पुणे), डॉ. दिनकर माने (औरंगाबाद) हे उपस्थित होते. पत्रकारिता हे व्रत असून त्याद्वारे समाजबदलाची प्रक्रिया घडून येते. ही प्रक्रिया ताकदीने घडण्यासाठी नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या पत्रकारांनी बहुविध माध्यम कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन डॉ.भानावत यांनी केले. जनमत निर्माण करणारी पत्रकारिता करावी, असे मत डॉ.पवार यांनी व्यक्त केले.
माध्यमांसोबतच जनसंपर्क क्षेत्रातही करिअरच्या खूप संधी निर्माण होत आहेत. संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन उमेश काशीकर यांनी केले. डॉ. नीशा पवार यांनी प्रास्ताविक केले. तेजस्विनी कांबळे यांनी संचालन केले तर डॉ. विनोद निताळे यांनी आभार मानले.