नागपूर : सबकुछ ऑनलाइनच्या जमान्यात अनेकांचा व्यवसाय हा सोशल मीडिया मार्केटिंग व डेटाच्या आधारावर चालतो. मात्र याच डेटामुळे अनेकांमध्ये इतरांप्रती असुरक्षिततेची भावनादेखील निर्माण होते. आपल्याकडे काम करणाऱ्या झुंबा ट्रेनरने जास्त पगार मागितला म्हणून चक्क एका बॉसने तिच्या मोबाइलमधील विविध सोशल मीडिया खात्यांसह फोनमधील डेटादेखील उडविला. यासंदर्भात महिलेने थेट पोलिसांतच धाव घेतली व प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी बॉससह दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. किरण व दीपक कोटवानी हे दाम्पत्य हे पीबीएस फिटनेस स्टुडिओ चालवितात. तेथे खुशी नावाची झुम्बा ट्रेनर कार्यरत होती. दीड वर्षाअगोदर जे वेतन निश्चित झाले होते ते देण्यास नंतर तिच्या बॉसने नकार दिला. याशिवाय फिक्स्ड पेमेंट देण्यासदेखील नकार दिला. त्यामुळे खुशीने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. ३१ जानेवारी रोजी किरण कोटवानीने तिच्याकडून तिचा मोबाइल मागितला. तिच्या मोबाइलमध्ये क्लाएंट्सचे ग्रुप होते. कोटवानीने ते ग्रुप्स डिलिट केले. त्यानंतर आठ तास मोबाईल दाम्पत्याच्याच ताब्यात होता. या कालावधीत खुशीचे इन्स्टाग्राम अकाैंट डिलिट केले व जी-मेलचा पासवर्ड बदलला होता. सोबतच तिचा जी-मेल आयडी व व्हॉटस्अप त्यांनी स्वत:च्या फोनशी लिंक करवून घेतले. याशिवाय फोनमधील महत्त्वाचे फोटो, डॉक्युमेंट्स, नोट्स, व्हिडीओदेखील डिलिट केले होते. हा प्रकार पाहून खुशीला धक्काच बसला. आरोपींनी ५ फेब्रुवारीपर्यंत तिचे व्हॉटस्अप अकाैंट त्यांच्या फोनवरून चालविल्याचीही तिने दावा केला व जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत किरण व दीपक कोटवानीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.