नरेश डोंगरे नागपूर भयावह क्रौर्याचा सूत्रधार असलेल्या सिद्धदोष कैद्याला फासावर चढविण्याची तयारी सुरू असल्याने देशाच्या हृदयस्थळी अर्थात् नागपुरात प्रशासनाची अन् नागरिकांच्याही हृदयाची धडधड वाढली असते. देशभरातील सुरक्षा यंत्रणेवर या घटनेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताण असतो. याचवेळी देशाच्या राजधानीत मध्यरात्रीनंतर अभूतपूर्व घडामोडी घडू लागल्याने ही धडधड अधिकच तीव्र होते. ९९ दोषी सुटले तरी चालेल. मात्र, एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये, या तत्त्वाने नावारुपाला आलेल्या भारतीय आदर्श न्यायव्यवस्थेचा सुवर्ण अध्याय लिहिण्याची दिल्लीत तयारी सुरू होते. भारतात आतापावेतो कधीच न घडलेल्या घटनाक्रमाला सुरूवात होते. पहाटे अडीचच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचे दार उघडले जाते. न्यायमूर्ती स्थानापन्न होतात. मुंबईत स्फोटाची मालिका घडवून २५७ निरपराधांचे बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब अब्दुल रज्जाक मेमन (वय ५३) याच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे सर्व कायदेशीर पैलू चर्चेला येतात. तब्बल अडीच तास दोन्हीकडून युक्तिवाद होतो. तो ऐकून पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निकाल देतात. याकूब मेमनला सुनावलेली फाशीची शिक्षा अन् तेव्हापासून आता फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला काही क्षण शिल्लक असतानापर्यंत शासन आणि कारागृह प्रशासनाने सर्व प्रक्रिया कायदेशीर चौकटीत पूर्ण केल्या. भारतीय न्यायव्यवस्थेची सुवर्णपताका जगभरात नागपूर : आरोपीला बचावाची, आपले मत मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली. त्याचे सर्व पर्याय त्याने अवलंबिले. त्यामुळे आता शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी, असा हा निकाल असतो. भारतीय न्यायव्यवस्थेची सुवर्णपताका जगभरात फडकविणाऱ्या या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण झाले. २९ जुलै २०१५ हा तो दिवस ! या दिवशी नागपूरसह अवघा देशच जागा होता. सुरक्षा यंत्रणा, शासन प्रशासनच नव्हे तर देशातील कोट्यवधी सर्वसामान्य नागरिक (अन् कित्येक देशातील मंडळीसुद्धा) टीव्ही संचासमोर बसून रात्रभर जागले. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूबला फासावर चढविण्याची तयारी पूर्ण झाली होती. एक आठवड्यापासून त्याची रंगीत तालिमही घेण्यात आली होती. फाशी देण्याची वेळ काही तासांवर आली असताना २९ जुलैच्या मध्यरात्री राज्यपालांनी फेटाळलेल्या दयेच्या अर्जाला आव्हान देत याकूबच्यावतीने देशातील काही नामवंत वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे धाव घेतली. त्यानंतर ऐतिहासिक घडामोडी सुरू झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठापुढे पहाटेपर्यंत याकूबचे वकील आणि सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. अनेकांचे श्वास रोखून धरणारी ही प्रक्रिया कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढवणारी होती. देशभरात ही स्थिती असताना २९ जुलैच्या सायंकाळपासून संपूर्ण प्रशासन आणि अर्धेअधिक नागपूर रस्त्यावर होते. नागपूरच्या चौकाचौकात पोलीस होते. कारागृहाच्या चहुबाजूला देशविदेशातील मीडिया तसेच सर्वसामान्य नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. याकूबचे नातेवाईक थांबलेल्या हॉटेलसह उपराजधानीतील बहुतांश हॉटेल, लॉज, विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मॉल्स, चित्रपटगृहे, गर्दीच्या ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणांनी नजर रोखली होती. रस्त्यारस्त्याने पोलिसांची वाहने धावत होती अन् जागोजागी पोलीस विविध व्यक्ती, वाहनांची तपासणी करताना दिसत होते. प्रचंड ताण अन् अनामिक दडपण नागपूरकर मंडळी अनुभवत होती. नागपूरकरांसाठी २९ जुलैच्या आठवणी अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. येथील कारागृह प्रशासनासाठी तर ही तारीख दगडावरची रेघच ठरली आहे. याकूबच्या फाशीच्या अनुषंगाने येथे महिनाभरापूर्वी सुरू झालेली तयारी, त्यानिमित्ताने आतबाहेर करण्यात आलेला बंदोबस्तही तसाच आहे. किंबहुना हा बंदोबस्त वर्षभरात टप्प्याटप्प्याने अधिकच कडक करण्यात आला आहे. प्रत्येक वाहन अन् व्यक्तीची बाहेरपासूनच कडक तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल जॅमर (पुरते प्रभावी नसले तरी...!), अंतर्गत अन् बहिर्गत सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. फाशीच्या शिक्षेला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याला काही तास शिल्लक असल्याने कारागृहात आत अन् बाहेरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातही खास सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. (प्रतिनिधी) तो दिवस, ती रात्र थरारकच : जिल्हाधिकारी कुर्वे याकूबच्या फाशीच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका वठविणारे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणतात, २९ जुलैचा दिवस अन् रात्रही थरारकच होती. गोपनीयतेमुळे अनेक बाबी सांगणे योग्य नाही. मात्र, प्रत्येक घडामोड श्वास रोखायला लावणारी होती. क्षणोक्षणी दिल्ली आणि मुंबईत सुरू असलेल्या घडामोडींकडे प्रशासनाचे लक्ष होते. धोका नाही : अति.पो. महासंचालक डॉ. उपाध्याय १०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. आतमधील भिंत मजबूत करणे सुरू आहे. कारागृहासमोर बॅरिकेडस् लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहन अथवा व्यक्ती आधीसारखा थेट कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊ शकत नाही. याशिवाय वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. इस्रायलची चमू सुरक्षेच्या उपाययोजनांचा ‘अहवाल‘ देऊन गेली. त्या लवकरच अमलात येतील. त्यामुळे आता धोका नाही, असे राज्याचे कारागृह प्रशासन प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणतात.
तो दिवस न्यायाच्या विजयाचा ऐतिहासिक न्यायनिवाड्याची वर्षपूर्ती
By admin | Published: July 29, 2016 2:42 AM