लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. २००९ पासून ते संघाचे सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडत होते. संघाच्या बंगळुरू येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची निवड झाली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व मावळते सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला व एकमताने त्यांची निवड झाली.६६ वर्षीय होसबळे हे कर्नाटक मधील शिमोगा जिल्ह्यातील सोराबा येथील आहेत. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होसबळे हे लहानपणीच संघाची जुळले होते. १९७२ सालापासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य म्हणून काम केले. आणीबाणीत त्यांनी कार्य केले होते व मिसाअंतर्गत ते तुरुंगातदेखील होते. १९७८ साली ते विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्य सुरू केले. नागपूर नगर संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली व त्यानंतर विद्यार्थी परिषदेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणूनदेखील त्यांनी कार्य केले. देशात अनेक ठिकाणी अभाविपच्या कार्यविस्तारात त्यांनी मौलिक भूमिका पार पाडली. २००४ मध्ये त्यांना संघाचे अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख बनविण्यात आले. २००९ मध्ये ते संघाचे सहसरकार्यवाह बनले. त्यानंतर संघाच्या विस्तारात त्यांची मोठी भूमिका राहिली. २०१४ च्या निवडणूकांच्या अगोदर नरेंद्र मोदी यांना भाजपचा चेहरा म्हणून समोर आणण्यासाठी होसबळे आग्रही होते.
आपत्कालिन परिस्थितीत सांभाळला मोर्चादत्तात्रेय होसबळे यांनी अनेक आपत्कालिन स्थितीत संघाच्या सेवाकार्यांचे नियोजन केले. २०१५ साली नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपादरम्यान संघातर्फे मदतकार्य सुरू करण्यात आले होते. त्यावेळी नेपाळमध्ये प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन होसबळे यांनी मोर्चा सांभाळला होता.