लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारुमुळे झालेल्या घरगुती वादातून एका अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांनी विष घेतले. यात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून वडिलांची प्रकृती गंभीर आहे.कोतवाली पोलीस ठाण्याच्या नंदाजीनगरात ही घटना घडली असून समीक्षा सुरेश डांगरे (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सुरेश डांगरे आपली पत्नी सुरेखा हिच्यासोबत नाश्त्याचे दुकान चालवितो. दारूचे व्यसन असल्यामुळे तो रोज घरी वाद घालतो. यामुळे घरातील वातावरण खराब होते. त्याचे पत्नीसोबत नेहमीच भांडण होते. २८ सप्टेबरला रात्री सुरेश घरी पोहोचल्यानंतर त्याने वाद घालणे सुरु केले. तो आरडाओरड करीत असल्यामुळे समीक्षाने वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यामुळे सुरेशने मुलीसोबत वाद घालणे सुरू केले. सुरेशने समीक्षाला मोठ्या आवाजात बोलू नको असे सांगितले. त्यानंतर त्याने विष घेतले. हे पाहून समीक्षाने वडिलांकडे धाव घेऊन रागाच्या भरात वडिलांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून विष प्राशन केले. सुरेखाने आरडाओरड करून शेजाऱ्यांना सूचना दिली. त्यांच्या मदतीने दोघांनाही मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान समीक्षाचा मृत्यू झाला. समीक्षा कमला नेहरू महाविद्यालयात बी. कॉम प्रथम वर्षाला शिकत होती. ती हुशार विद्यार्थिनी होती. ती आईवडिलांकडे लक्ष देत होती. वडिलांनी दारू पिऊन वाद घालणे तिला पटत नव्हते. ती नेहमी वडिलांना दारू सोडण्याची विनंती करीत होती. सुरेशच्या दारूमुळे समीक्षाचा मृत्यू झाला आणि त्याची प्रकृतीही गंभीर आहे. सुरेशने थोडे विष घेतले, परंतु समीक्षाने बाटलीतील सगळे विष प्राशन केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वडिलांच्या हातातील विष घेतल्याने मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 11:58 PM
दारुमुळे झालेल्या घरगुती वादातून एका अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांनी विष घेतले. यात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून वडिलांची प्रकृती गंभीर आहे.
ठळक मुद्देवडिलांची प्रकृती गंभीर : घरगुती वादातून घडली घटना