दिवसकालीन शिक्षकांना रात्रकालीन शाळेत काम करता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 09:16 PM2018-01-30T21:16:38+5:302018-01-30T21:17:45+5:30
दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांना रात्रकालीन शाळांमध्ये काम करता येणार नाही. राज्य शासनाच्या यासंदर्भातील निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले, तसेच शिक्षकांची या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांना रात्रकालीन शाळांमध्ये काम करता येणार नाही. राज्य शासनाच्या यासंदर्भातील निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले, तसेच शिक्षकांची या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली.
दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांना रात्रकालीन उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात तदर्थ शिक्षक म्हणून नियुक्त करण्याची तरतूद महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट आॅफ प्रायव्हेंट स्कूल रुल्स-१९८१ मध्ये आहे. परंतु अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी राज्य शासनाने दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांच्या रात्रकालीन शाळांतील नियुक्त्या रद्द केल्या. त्यासंदर्भात १७ मे २०१७ रोजी निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. रात्रकालीन शाळांमध्ये नियमित शिक्षकांची नियुक्ती करता येत नाही. रात्रकालीन शाळांना शिक्षण हक्क कायदा लागू होत नाही. त्यामुळे या शाळांत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाऊ शकत नाही. तसेच शासनाच्या निर्णयामुळे कायद्यातील तरतुदींचे पालन टाळता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता शासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी तर शासनातर्फे अॅड. भगवान लोणारे यांनी बाजू मांडली.