योगेश पांडे, नागपूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसराजवळील एक ऑटोचालक व त्याच्या साथीदारांनी तीन मित्रांना मारहाण करत लुटले. आरोपींनी कामगार मित्रांच्या मोबाईलमधून जबरदस्तीने पैसे स्वत:कडे वळते करून घेतले. पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अनिलकुमार शिवकुमार निषाद (१८,परासिया, छिंदवाडा) हा त्याच्या दोन मित्रांसोबत वर्धा येथे गिट्टी क्रशर मशीनवर गिट्टी फोडण्याचे काम करतो. त्याच्या मित्राचे चांदामेटा येथे लग्न असल्याने मंगळवारी दुपारी तीन वाजता तीनही मित्र वर्ध्याहून नागपुरला पोहोचले. बसस्थानकाजवळून त्यांना मध्यप्रदेशला जाणाऱ्या बसेसच्या स्थानकावर जायचे होते. ते ऑटो शोधत असताना प्रितम विश्वनाथ गडलिंग (२७, रामबाग) हा ऑटोचालक त्याच्या मित्रासह पोहोचला. त्याने मध्यप्रदेश बसस्थानकात सोडून देतो असे म्हणून तीनही मित्रांना बसविले.
त्याने ऑटो शांती प्रेम टूर्स ॲंड ट्रॅव्हल्ससमोर आणला व अनिलकुमारच्या मित्रांचे केस पकडून त्यांना ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात नेले. तेथे त्याचे साथीदार रशीद शेख रफीक शेख (३४,राऊत नगर, दिघोरी), शुभम प्रशांत नगराळे (३०, लाॅगमार्च चौक, ईमामवाडा), गुलाम शाबीर शेख (३२, आझाद कॉलनी, उमरेड मार्ग), पंकज मंगललाल यादव (२२, रिवा, मध्यप्रदेश), आकाश नामदेव खोब्रागडे (४६, इमामवाडा) हे तेथेच होते. त्यांनी तीनही मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केली. एका मित्राच्या खिशातून सातशे रूपये रोख व दुसऱ्याच्या खिशातून मोबाईल हिसकावला. त्याचा पासवर्ड विचारून त्याच्या मोबाईलमधून दोन हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आकाश खोब्रागडे याने त्याच्या ऑटोतून तिघांनाही मध्यप्रदेश बसस्थानकावर सोडले व छिंदवाडाकडे जाणाऱ्या बसमध्ये जबरदस्तीने बसविले. अनिलकुमारने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हे दाखल करत सहाही जणांना अटक केली. तर त्यांच्या सातव्या साथीदाराचा शोध सुरू आहे.