नागपूर : नागपुरात मंगळवारी वातावरणात परिवर्तन दिसून आले. सकाळपासून आकाशात ढगांचा राबता होता. त्यामुळे, दिवसाच्या तापमानात १.८ अंश डिग्रीची घसरण होत तापमान २६.६ अंश डिग्रीवर पोहोचले.
गेल्या दोन दिवसांपासून दिवसाच्या तापमानात सातत्याने घसरण दिसून येत आहे. त्यातच रात्री ०.४ अंशाची घसरण होत तापमान १३.२ अंश डिग्रीवर पोहोचले. दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा एक डिग्रीची घसरण झाल्याने गारवा आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.
मोसम विभागाच्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस आकाशात ढग राहतील. आर्द्रतेचा स्तरही ५० टक्के राहील. त्यामुळे, किमान तापमान १३ ते १५ डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३० डिग्रीच्या खाली राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
नागपुरात दिवसाची आर्द्रता ७४ टक्के, तर संध्याकाळी ६५ टक्के होती. वाऱ्याची दिशा पूर्व-उत्तर पूर्व अशी होती. ३.६ प्रतितासाने वारा वाहत होता. त्यामुळे, सूर्यास्तानंतर तापमानात गतीने घसरण झाली. विदर्भात गोंदियाचे तापमान सर्वांत कमी १२.१ अंश डिग्री सेल्सिअस इतके होते.