लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन(डीबीए)च्या वतीने बुधवारी शांततेच्या मार्गाने निषेध करण्यात आला.जिल्हा व सत्र न्यायालयातील शेकडो वकिलांनी काळ्या कोटावर लाल फिती लावून काम केले. तसेच, दुपारी २ वाजता न्यायालयापुढे गोळा होऊन हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा, महासचिव अॅड. नितीन देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी न्यायालय सुरक्षा यंत्रणेतील पोलिसांना गुलाबपुष्प देऊन बंधूभाव कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावर्षी देशात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांनी देशाला अहिंसेचा संदेश दिला होता. त्या मार्गावर देशाने वाटचाल करायला हवी. हिंसा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही, असे अॅड. सतुजा यांनी यावेळी बोलताना सांगितले.आंदोलनात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे सदस्य पारिजात पांडे, संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश जयस्वाल, विवेक कराडे, कीर्ती कडू, शबाना खान, पारुल शेंद्रे, विनोद खोबरे, विलास राऊत, रोशन बागडे, वासुदेव कापसे, कैलाश दोडानी, उमा अग्रवाल, अजय निकोसे, प्रेम रामटेके, अर्पणा काबरा, राकेश कोचर, नितीन रुडी आदी वकील सहभागी झाले होते.
नागपुरात वकिलांवरील हल्ल्याचा 'डीबीए'द्वारे शांततेच्या मार्गाने निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 10:38 PM
नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन(डीबीए)च्या वतीने बुधवारी शांततेच्या मार्गाने निषेध करण्यात आला.
ठळक मुद्देपोलिसांना दिले गुलाबपुष्प : काळ्या कोटांना लावल्या लाल फिती